वन्यजीवांवरही घातक परिणाम

वन्यजीवांवरही घातक परिणाम
तळोजा वन्यजीवांवरही घातक परिणाम इंट्रो तळोजा औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांतून निघणाऱ्या घातक धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पर्यावरण तसेच वन्यजीवांवरही याचा परिणाम होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. २०१७ मध्ये डाय तयार करणाऱ्या कंपनीतून सोडण्यात येणाऱ्या धुरामुळे एक भटके श्वान निळे झाल्याचा प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणला. श्वानानंतर चिमणीसुद्धा निळी झाल्याचे दिसून आले आणि तळोजा औद्योगिक वसाहतीतून होणाऱ्या प्रदूषणाचा घातक परिणाम अधोरेखित झाला; पण हे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापर्यंत कोणत्याही प्रभावी उपाययोजना केल्याचे दिसून येत नाहीत. तळोजा औद्यागिक परिसरातील घातक रासायनिक कंपन्यांमधील सांडपाणी थेट नदीत जाऊ नये, यासाठी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण केंद्राची (सीईटीपी) निर्मिती करण्यात आली. या केंद्रात दिवसाला २२.५ एमएलडी केमिकलयुक्त पाण्याचे शुद्धीकरण करण्याची क्षमता आहे. दिवसातून १९ एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण केले जाते; मात्र तळोजा औद्यागिक वसाहतीमध्ये तब्बल ६०० पेक्षा जास्त घातक रासायनिक कारखाने आहेत आणि या कंपन्यांचे सांडपाणी शुद्धीकरण न करताच थेट नदीच्या प्रवाहात सोडून दिले जात असल्याचे ग्रामस्थांनी अनेक वेळा उघडकीस आणले आहे. काही दिवसांपूर्वीच तळोजातील सर्व कंपन्यांमधून निघणारे सांडपाणी सीईटीपी केंद्रात वाहून नेणारी एक जलवाहिनी फुटली होती. या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाकडे एमआयडीसी, सीईटीपी केंद्र व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दुर्लक्ष केल्याने लाखो लीटर केमिकलयुक्त पाणी थेट नदीच्या प्रवाहात जात होते. त्यामुळे काही ग्रामस्थांनी नदीच्या प्रदूषणाच्या तक्रारी वारंवार संबंधित विभांगाकडे केलेल्या आहेत; मात्र त्यांच्या तक्रारींना नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखवली जात असल्याने अद्याप हे प्रदूषण रोखण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, अशी तक्रार पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केली आहे. अखेर काही होतकरू तरुणांनी कासाडी नदीच्या पाण्याचे नमुने घेऊन परीक्षणासाठी नवी मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेत दिले. तेव्हा कासाडी नदीत मोठ्या प्रमाणात दूषित रसायनांचा भरणा असून नदीचे पाणी प्रदूषित झाल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या प्रयोगशाळेने काढला. कासाडी नदीतील प्रदूषित पाण्यामुळे नदीकिनारी राहणारे व नदीच्या पाण्यावर शेती करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतून वाहत जाणाऱ्या कासाडी नदीच्या प्रदूषणाचा फटका नदीकिनारी असणाऱ्या रोडपाली गाव, रोडपाली, बौद्धवाडी, नावडे गाव, कोपरे गाव, पडघे गाव, तोंढेरे गाव, कोलवाडी गाव, डोंगऱ्याचा पाडा गाव, देवीचा पाडा गाव व पेइंधर गाव येथील ग्रामस्थांना बसत आहे. या गावांमध्ये नदीकिनारी शिल्लक राहिलेल्या शेतजमिनीत काही शेतकरी कुटुंबे मोठ्या प्रमाणात भातशेती, दुधी-भोपळा, वांगी, टोमॅटो, शिराळे, पडवळ अशी विविध प्रकारची फळशेती करत असतात. काही कोळी समाजाची कुटुंबे या नदीतील प्रवाहात मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात, पण नदीतील पाणी प्रदूषित झाल्याने नदीतील मासे मरण पावतात. तसेच दूषित पाण्यामुळे शेती करणेही कठीण होत असल्याच्या तक्रारी येथील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तळोजा सीईटीपी केंद्रातून निघणाऱ्या अशुद्ध पाण्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास, दमा, एलर्जी, त्वचारोग, डोळे जळजळणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे; तर पडघे गावातील काही लहान मुलांचे वयाच्या सातव्या, दहाव्या वर्षीच केस पांढरे होण्याचे प्रकारही समोर आले आहेत. तळोजातून वाहणारी कासाडी नदी रोडपाली गावाजवळून वाहत जाऊन पुढे जुई-कामोठे वसाहतीशेजारून खाडीत मिसळते. त्यामुळे नदीतील घातक रसायनांचा रोज रात्री व पहाटे उग्र वास येत असल्याच्या तक्रारी कामोठे वसाहतीमधील रहिवाशांनी केल्या आहेत. एवढ्या समस्या असूनही आतापर्यंत येथील हवेतील प्रदूषण मोजण्यापलीकडे काही कार्यवाही झाल्याचे आढळत नाही. पनवेल महापालिकेचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी तळोजातील प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित लवादापुढे याचिका केली होती. याचिकेवर लवादाने काही कंपन्यांना फटकारत दंडात्मक कारवाईची शिक्षा दिली होती, पण अशी कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाला का करता आली नाही, असा प्रश्न तळोजातील ग्रामस्थ विचारत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com