शाळा प्रवेशासाठी आधारकार्डची सक्ती रद्द करा
विद्यार्थी संकटात, शिक्षक आमदार नागो गाणार यांचा आक्षेप
मुंबई, ता. २ : शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्ययावत नाही, अथवा ज्यांनी आधारकार्डच काढलेले नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून आणि शैक्षणिक लाभांपासून वंचित ठेवण्याचा जीआर शिक्षण विभागाने काढला आहे. त्यावर शिक्षक आमदार नागो गाणार यांनी आक्षेप घेत हा जीआरच रद्द करण्याची मागणी शिक्षण आयुक्तांसह शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. या तुघलकी निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षण संकटात सापडल्याचे गाणार यांनी म्हटले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वर्षे वयोगटाच्या बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे. कोणत्याही कारणासाठी बालकांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवता येत नाही. अशा स्थितीत शिक्षण विभागाने आपल्या घटनात्मक कर्तव्याकडे दुर्लक्ष करत ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही, अथवा अद्ययावत केलेले नाही, अशा विद्यार्थ्यांचा शाळेतील प्रवेश गाह्य धरला जाणार नाही, असे शासन निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे ही बाब संविधानाचा अवमान करणारी असून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी असल्याचे आमदार नागो गाणार यांनी म्हटले आहे.
...हे तर खूप मोठे षड्यंत्र
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अद्ययावत करण्यासाठी आणि नवीन आधार कार्ड काढण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. सध्या असलेली यंत्रणा अत्यंत तोकडी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात न घेता शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य न धरण्याचा जीआर काढून लाखो मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र सुरू केल्याचा आरोपही आमदार गाणार यांनी केला आहे.