प्रवाशांचे सामान ने-आण करण्याचे काम खासगी कंपनीला देण्यास विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या टर्मिनसवर मागील अनेक वर्षांपासून हमाल प्रवाशांच्या सामानाची ने-आण करण्याचे काम करतात. याबदल्यात हमालाला रोजगार मिळतो. यावरच त्याच्या कुटुंबाची गुजराण होते; मात्र सध्या या कामात खासगी कंपनीची घुसखोरी होत असल्याने हमालाच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सामग्रीची ने-आण करण्याचे काम खासगी कंपनीला देऊ नये, अशी मागणी हमालांद्वारे करण्यात येत आहे. प्रशासनाने हमालाची मागणी मान्य केली नाही, तर देशपातळीवर आंदोलन करण्याची तयारी हमालांनी केली आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, एलटीटी, ठाणे, दादर, कल्याण आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे या टर्मिनसवर हमालांचा दैनंदिन रोजगार सुरू असतो; मात्र सध्या भारतीय रेल्वेमध्ये खासगीकरणाचे वारे सुटल्याने अनेक क्षेत्रांचे खासगीकरण झाले आहे. रेल्वेमध्ये खासगी तत्त्वावर कर्मचारी, कामगार काम करत आहेत. आता हमालांच्या कामांमध्ये खासगी कंपनी शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहे. मध्य रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून हमालाचे काम खासगी कंपनीला देण्याची योजना आखली जात आहे. यासंदर्भातील पत्रक काढण्यात आले; मात्र हमालांना विश्वासात न घेता हे पत्रक काढण्यात आले आहे, अशी तक्रार हमालांनी व्यक्त केली. सध्या प्रवाशांच्या सामग्रीची एक फेरी केल्यावर १०० रुपयांपर्यंत मोबदला मिळतो; मात्र खासगी कंपनीस हे काम दिल्यास २० रुपये मिळतील. त्यामुळे ८० रुपयांचे नुकसान सोसावे लागेल. दिवसाचे उत्पन्न कमी होईल. यात जगणार कसे, असा प्रश्न हमालांना पडला आहे.
---
मध्य रेल्वेने खासगी कंपनीला जे काम द्यायचे ठरवले आहे, ते तात्काळ रद्द करावे किंवा २००८ मध्ये काही हमालांना रेल्वे विभागात कायम करण्यात आले होते तसेच आता परवानाधारक हमालांना रेल्वेत भरती करून खासगी कंपनीला प्रवाशांच्या सामग्रीची ने-आण करण्याचे काम द्यावे. ५ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत रेल्वे हमालांना प्रवेश देण्यात यावा. या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास हमाल लोकलसमोर उड्या घेऊन जीवन संपवतील, असे पत्र लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे रेल्वे हमाल कुली कामगार युनियनचे मुख्य प्रवर्तक धनराज गुट्टे यांनी मध्य रेल्वेला दिले आहे.