मनोर पोलिसांनी गो तस्करी रोखली
एक हजार किलो गोमांस जप्त; तिघांना अटक
मनोर, ता. ३ (बातमीदार) ः मनोर पोलिसांनी विक्रमगडच्या भोपोली गावच्या हद्दीत वॅगन आर कारमधून दोन जिवंत बैल, तर पीकअप टेम्पोमधून एक हजार किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गो-तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक केलेल्या आरोपींची नावे शब्बीर अहमद शगिर अहमद शेख (५० रा. भिवंडी). शरीफ हनिफ कुरेशी,(३५रा. भिवंडी), तबरेज फ़ारुख शेख (२२ रा.भिवंडी) अशी आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मनोर वाडा रस्त्याच्या दिशेने गो-तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मनोर पोलिसांनी टेन नाका येथे नाका बंदी आणि सापळा रचला होता. सकाळी सातच्या सुमारास महामार्गावरून टेन नाक्याच्या दिशेने आलेल्या संशयास्पद वॅगन आर कार आणि पीक अप टेम्पो चालकाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला होता; परंतु कार चालकाने नाका बंदीवरील पोलिसांच्या वाहनाला ठोकर मारून कार महामार्गावर वळवून गुजरातच्या दिशेने पळून गेला होता; तर पीक अप टेम्पो मनोर वाडा रस्त्याच्या दिशेने पळून गेला होता. पोलिसांकडून दोन्ही वाहनांचा पाठलाग सुरू करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांकडून कारचा पाठलाग सुरू असताना कार विक्रमगड रस्त्यावरील भोपोली गावच्या हद्दीत कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका घराच्या जोत्याला धडकल्याने कारचा अपघात झाला होता. भोपोली गावच्या ग्रामस्थांनी कारचालक आणि इतर दोन आरोपींना पकडून त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये गुंगीत असलेले दोन जिवंत बैल आढळून आले. बैलांसह कार जप्त करून मनोर पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मनोर पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रदीप कसबे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक अजित कणसे यांच्या पथकाने केली.
तीन जण फरारी
मनोर-वाडा रस्त्याच्या दिशेने पळून गेलेल्या पीक अप टेम्पो एका ठिकाणी उभा करीत अंधाराचा फायदा घेत टेम्पो चालकासह तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी गोमांसासह पीक अप टेम्पो जप्त केला आहे.