लस न घेताच पळ काढलेल्या तरुणाचा
१२ दिवसांनंतरही शोध नाही
डोंबिवली, ता. ३ ः एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ओमिक्रॉनचा धोकाही वाढला आहे. यामुळे लसीकरणावर पुन्हा जोर दिला जात आहे. १२ दिवसांपूर्वी डोंबिवलीतील लसीकरण केंद्रावर नावनोंदणी करून लस न घेताच पळून गेलेल्या ऋषीकेश मोरेचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही. केवळ त्याचा मोबाईल नंबर आरोग्य विभागाकडे असून तो नंबरही उचलला जात नसल्याने आरोग्य विभाग हतबल झाले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नेहरू मैदान येथील लसीकरण केंद्रावर २३ डिसेंबरला ऋषीकेश मोरे हा तरुण लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आला होता. नावनोंदणी केल्यानंतर लस घेण्यास टाळाटाळ करत त्याने आरोग्य केंद्रावरून पळ काढला होता. त्या तरुणाचा शोध घेत त्याचे लसीकरण केले जाईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला होता. मात्र, या घटनेला १२ दिवस उलटले तरी पालिकेला त्याचा शोध घेता आलेला नाही.
आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
नावनोंदणीच्या वेळेस या तरुणाचा केवळ मोबाईल क्रमांक आरोग्य विभागाकडे आहे. त्याचा निवासी पत्तादेखील नसल्याने नोंदणी कशा पद्धतीने केली गेली. त्या व्यक्तीचे महत्त्वाची कागदपत्रे तपासली गेली की नाही, त्यातील आधार कार्डचा नंबर प्रशासनाकडे नाही का? असे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न सजग नागरिक विचारत आहेत. दरम्यान त्या तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही, तसेच त्याला संदेश पाठवूनही त्यास त्याने प्रतिसाद दिला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.