धारावीत सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी
धारावी (बातमीदार) : धारावीतील झोपडपट्टी पोलिस पंचायत बिट क्र. २ व वूमन वेल्फेअर फोरम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल येथे ‘सावित्रीबाई यांचा जीवन संघर्ष व कार्य’ या विषयावर कार्यक्रम घेतला होता. या वेळी प्रमुख वक्त्या प्रबोधन युवा संघाच्या संध्या पानस्कर यांनी सावित्रीबाई यांचा जीवनाचा पट मांडला. आज आपण महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहोत. त्याचे सर्व श्रेय सावित्रीबाई यांना जाते, असे त्यांनी सांगितले. धारावी पोलिस ठाण्याच्या निर्भया पथकाच्या प्रमुख महिला उपनिरीक्षक वैशाली बोरसे, संत कक्कया विकास संस्थेचे सचिव राजेश खंदारे, अलका साबळे, साधना शिंदे, शंकर पोते, वंदना गाडेकर आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गाडेकर यांनी केले.
ॊ`गुरुनानक`मध्ये नाटकाद्वारे सावित्रीबाईंची संघर्षकथा
धारावी (बातमीदार) : सायन-कोळीवाडा येथील गुरुनानक महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती आज साजरी करण्यात आली. राज्यशात्र विभाग आणि संविधान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी `संविधान क्लब`च्या विद्यार्थ्यांनी `क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले` हे नाटक सादर केले. याद्वारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी रूढी परंपरा झुगारून स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिन्दर कौर भाटिया यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत, असे सांगितले. प्रा. सुमित खरात यांनी फुले दाम्पत्याने स्त्री-शिक्षणासाठी केलेला संघर्ष विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. दरम्यान, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांबाबत रुची निर्माण व्हावी, यासाठी चर्चासत्र आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संविधान क्लबने मुलींसाठी संविधान क्लब प्रीमियर लिग क्रिकेट सामन्याचे आयोजनही केले आहे.