लसीकरणासाठी पत्राद्वारे जनजागृती
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे पालकांना आवाहन
विरार, ता. ३ (बातमीदार) ः कोरोनाचे लसीकरण प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे; मात्र अजूनही ग्रामीण भागात लसीकरणाविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे हे गैरसमज दूर करण्यासाठी आणि लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी पत्राचा आधार प्रशासनाने घेतला आहे. पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थी आपल्या पालकांना पत्र लिहून लसीकरणाविषयी जागृती करत आहेत. शिवाय लस घेण्यासाठी त्यांना भावनिक आवाहन करत आहेत.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्प संचालित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकडून गावोगावी त्यांच्या पालकांना पत्र पाठवून पाल्यांनी आपल्या पालकांमध्ये जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आदिवासी विकास विभाग संचालित डहाणू आणि पालघर तालुक्यातील तब्बल १२ आश्रमशाळांतील तीन हजार विद्यार्थ्यांनी हे पत्र आपल्या राहत्या घरी टपालाने पाठवल्याचे प्रांताधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी अशिमा मित्तल यांनी सांगितले.
आदिवासी भागात लसीकरणाविषयी अनेक गैरसमज असल्याने लसीकरणाची टक्केवारी कमी दिसून येते. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी लसीकरण करण्याची गरज आहे. वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करूनही नागरिक लसीकरणाला तयार होत नसल्याने प्रांताधिकारी अशिमा मित्तल यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
पत्रातील मजकूर
कृपया या साथीच्या आजारात कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण करा. आश्रमशाळेतील आमच्या शिक्षकांनीही लसीकरण केले आहे आणि ते सुरक्षित आहेत. त्यामुळे तुम्हीही लसीकरण करा.
लसीकरणासाठी भावनिक आवाहन विद्यार्थ्यांनी पालकांना केले आहे. या उपक्रमामुळे आदिवासी भागातील नागरिकांत लसीकरणाची जनजागृती होऊन नागरिकांत लसीकरणाला प्रतिसाद वाढेल.
- अशिमा मित्तल, प्रांताधिकारी