शहापूर नगरपंचायतीच्या ४ जागांसाठी १७ अर्ज
शहापूर, ता. ३ (बातमीदार) ः शहापूर नगरपंचायतीतील चार जागांसाठी १७ अर्ज दाखल झाले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण असलेल्या या चार जागांसाठी ओबीसी उमेदवार रिंगणात उतरविण्याची विविध पक्षांनी केलेली घोषणा पाळल्याचे दिसून आले.
आज शिवसेनेच्या वतीने अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी शक्ती प्रदर्शन करीत प्रचार रॅली काढण्यात आली. वार्ड क्रमांक ६ मध्ये शिवसेनेतर्फे सुविधा विनोद भोईर, तर भाजपच्या विमल रघुनाथ पष्टे, तर राष्ट्रवादीतर्फे वैशाली विनायक सापळे यांचा अर्ज दाखल केला आहे. वार्ड क्रमांक सातमध्ये शिवसेनेचे सुभाष शांताराम विशे, भाजपचे हरेश पष्टे रिंगणात आहेत. राष्ट्रवादीतर्फे स्वाती दत्तात्रय विशे यांनी अर्ज दाखल केला आहे. वार्ड क्रमांक १० मध्ये शिवसेनेचे विजय मनोहर भगत, तर काँग्रेसकडून अपर्णा खाडे यांनी अर्ज दाखल केला. येथे भाजपचा उमेदवार न ठरल्याने भाजपच्या आनंद अधिकारी, डॉ. अरुण झंवर व मंदार काबाडी यांचे अर्ज आले आहेत. भाजपचा अधिकृत उमेदवार नंतर जाहीर करण्यात येणार आहे. वार्ड क्रमांक १६ मधून सेनेकडून मयुरी सुनील म्हात्रे, भाजपकडून मनीषा सतीश अधिकारी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.