पुन्हा ऑनलाईन शिक्षण
मुंबईत पहिली ते नववी, अकरावीचे वर्ग बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांत मोठी वाढ होत असल्याने मुंबईतील सर्व मंडळांचे नववीपर्यंतचे वर्ग आणि कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे वर्ग ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी हा निर्णय आज जाहीर केला.
कोविडची पहिली लाट सुरू झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. कोविडची दुसरी लाट ओसरल्यानंतर तब्बल २० महिन्यांनंतर ४ ऑक्टोबरपासून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले होते; तर अवघ्या १५ दिवसांपूर्वीच पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते; मात्र आता कोरोना रुग्णांत मोठी वाढ होत आहे. तसेच, ओमिक्रॉनचाही समूह संसर्ग होत असल्याने शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा बंद होणार असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू राहाणार आहे. त्यासाठी सर्व शाळा व्यवस्थापनांनी सोय करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
---
लसीकरणासाठी शाळेत बोलावणार
१५ ते १८ वर्षे वयोगटीतील विद्यार्थ्यांचे लसीकरण आजपासून सुरू झाले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
मुंबईतील स्थिती
पहिली ते नववी
- विद्यार्थी - सुमारे १५ लाख
- शाळा - सुमारे ५ हजार
- शिक्षकेत्तर कर्मचारी - ७० हजार