राज्यातील पहिली मात्रा ८८ टक्के पूर्ण
तीन जिल्हे सरासरीपेक्षा पिछाडीवर, दुसऱ्या मात्रेच्या प्रमाणात वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे, तर राज्यातील कोरोना प्रतिबंधक लशीची पहिली मात्रा ८८ टक्के पूर्ण झाली आहे. अद्याप तीन जिल्हे सरासरीपेक्षाही पिछाडीवर आहेत. दुसरी मात्रा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून ५९ टक्के नागरिक सुरक्षित झाले आहेत. मात्र बीड, नांदेड णि नंदूरबार हे तीन जिल्हे सरासरीपेक्षा पिछाडीवर आहेत.
राज्यात आजतागायत लशीच्या १३.३६ कोटी मात्रा पुरवण्यात आल्या आहेत. त्यात पहिल्या आठ कोटी मात्रा आणि त्यानंतर ५ कोटी ३५ लाख दुसरी मात्रा देण्यात आली आहे. संपूर्ण लस उद्दिष्ट पूर्तीपासून राज्य अद्याप दूर असल्याचे सांगण्यात आले. सर्वाधिक लसीकरणात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
...
नऊ टक्के मात्रा महाराष्ट्राला
लोकसंख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात तब्बल १३ कोटी ३६ लाख मात्रा पुरविण्यात आल्या आहेत. देशातील एकूण एक अब्ज ४५ कोटी मात्रांपैकी ९.२ टक्के मात्रा या महाराष्ट्राला पुरविण्यात आल्या आहेत.
...
कोट
लसीकरण उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. ८८ टक्के पहिला आणि ५९ टक्के दुसरी मात्रा दिली गेली आहे. मुंबई, पुण्यात प्रौढांनी पहिली मात्रा घेण्याचे प्रमाण १०० टक्के इतके आहे.
- डॉ. सचिन देसाई, राज्य लसीकरण प्रमुख.
...
नांदेड पिछाडीवर
राज्यातील ११ जिल्ह्यांत ९० टक्क्यांहून अधिक, सात जिल्ह्यांत ८० टक्क्यांहून तर उर्वरित १५ जिल्ह्यांत ७० टक्क्यांहून अधिक दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. २० जिल्हे राज्य सरासरीच्या खाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील लसीकरण ४० टक्क्यांहून खाली आहे.
...