अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंचा
मुंबई उच्च न्यायालयात अर्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हल्ला प्रकरणात आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी (ता. ४) तातडीने त्यावर सुनावणी होणार आहे.
राणे यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि १२० ब सह ३४ (कटकारस्थान) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रचारापासून दूर करण्यासाठी शिवसेनेने मला या प्रकरणात अडकवले आहे, असा आरोप अर्जात करण्यात आला आहे. यामध्ये माझा सहभाग नसून राजकीय वैमनस्यामधून फिर्याद नोंदवण्यात आली असल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यावर मंगळवारी न्या. सी. व्ही. भडंग यांच्यापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे राणे यांचे वकील ॲड. संग्राम देसाई यांनी सांगितले.
बँकेच्या निवडणूक प्रचारामध्ये शिवसेना कार्यकर्ता संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, असा कथित आरोप राणे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यापूर्वी स्थानिक दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.