चेंबूरच्या वसाहतीसाठी ३०४ कोटी

चेंबूरच्या वसाहतीसाठी ३०४ कोटी

पुन्हा ‘आश्रय’ चेंबूरच्या वसाहतीसाठी ३०४ कोटी सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३ : मुंबई पालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाचा ‘आश्रय प्रकल्प’ चौकशीच्या फेऱ्यात आला आहे; मात्र त्यानंतरही पालिकेने चेंबूर येथील पी. एल. लोखंडे मार्गावरील वसाहतीच्या पुनर्विकासासाठी ३०४ कोटी रुपयांच्या खर्चाची तयारी सुरू केली आहे. तसा प्रस्ताव बुधवारी (ता. ५) होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. ‘आश्रय’ योजनेंतर्गत १,८०० कोटींहून अधिक रकमेच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे; मात्र भाजपच्या तक्रारींची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी याप्रकरणी चौकशीच्या सूचना राज्याच्या लोकायुक्तांना दिल्या आहेत. त्यात पालिकेने आणखी एका वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आणला आहे. लोखंडे मार्गावरील या वसाहतीत सध्या सफाई कामगारांची ४०४ घरे आहेत. त्याबदल्यात पालिकेला ३०० चौरस फुटांची ७९४ घरे आणि ६०० चौरस फुटांची १७४ घरे मिळणार आहेत. यासाठी पालिका ३०४ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. सर्व करांसहित हा खर्च ४०० कोटी रुपयांवर जाणार आहे. ... चर्चा तर होणारच १५ हजार १९० चौरस मीटरच्या भूखंडाच्या पुनर्विकासात चार चटई क्षेत्र निर्देशांकांसहित ६० हजार ७६३ चौरस मीटर बांधकामाचा आराखडा तयार केला होता. त्यातून ३०० चौरस फुटांची १,२४६ घरे आणि ६०० चौरस फुटांची १५५ घरे मिळणे अपेक्षित होते. प्रत्येक चौरस फुटासाठी पालिकेने ४,३४६ रुपयांचा खर्च अंदाजित केला होता. त्यानुसार निविदाही मागवण्यात आल्या होत्या; मात्र पात्र ठेकेदाराने ६५ हजार ५५ चौरस मीटरचे बांधकाम करून ३०० चौरस फुटांची ७९४ घरे आणि ६०० चौरस फुटांची १७४ घरे उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रामुख्याने या योजनेत कामगारांना ३०० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत; मात्र विकासक पालिकेच्या अंदाजपेक्षा ३०० चौरस फुटाच्या ४५२ सदनिका कमी देणार आहे; तर ६०० चौरस फुटाच्या १९ सदनिका अधिक देणार आहे. त्यामुळे वाढीव क्षेत्रफळांच्या घरांचे काय होणार, असा प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com