विद्यार्थ्यांचा लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये ६ हजार विद्यार्थ्यांना लसकवच
सकाळ वृत्तसेवा,
ठाणे, ता. ३ : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात ओमिक्रॉनचा धोकाही वाढला आहे. अशातच या आजारात लहान मुलांनाही धोका संभावत आहे. हे लक्ष्यात घेऊन सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरण मोहिमेला सोमवारपासून शुभारंभ झाला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात पहिल्याच दिवशी सोमवारी ठाणे महापालिकासह ग्रामीण भागातील ६ हजार ६५० तरुणांना लसीचे कवच मिळाले आहे.
मागील काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला होता. त्यात आता, पुन्हा ओमिक्रोनने डोकेवर काढले आहे. त्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही कमालीची वाढ होत आहे. अशातच या नव्या व्हेरीयंटचा धोका तरुणांसह लहानग्यांना देखील असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरणाची घोषणा केली. त्यानुसार देशभरासह ठाणे जिल्ह्यातही मुलामुलींच्या लसीकरणाला सोमवारपासून सुरुवात झाली. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० केंद्रांवर १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण मोहिम राबवण्यात येणार आहे. सामान्य रुग्णालय, शहापूर आणि भिवंडी उपजिल्हा रुग्णालय, मुरबाड ग्रामीण रुग्णालय यासह शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यातील प्रत्येक एक अशा पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील जोशी- बेडेकर महाविद्यालय (ठाणे कॉलेज) क्रिक रोड ठाणे, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, आनंदनगर लसीकरण केंद्र –चेकनाका ठाणे पूर्व, आर. जे. ठाकूर महाविद्यालय-लोकमान्यनगर आदी केंद्रांसह कल्याण डोंबिवली रुक्मिणी बाई रुग्णालय (कल्याण पश्चिम), शास्त्रीनगर रुग्णालय (डोंबिवली पश्चिम), सावळाराम क्रीडा संकुल (डोंबिवली पूर्व), शक्तिधाम कोळसेवाडी, आर्ट गॅलरी (कल्याण पश्चिम), मोहने लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.
चौकट -------
ठाणे जिल्ह्यात सोमवारी १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी तरुणांनी केंद्रवर लस घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. तर, अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यानुसार सोमवारी पहिल्याच दिवशी ठाणे महापालिकासह ग्रामीण भागातील ६ हजार ६५० तरुणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील तीन हजार ४८५ तर, ठाणे जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागातील ३ हजार १६४ तरुणांचा समावेश आहे.