‘बुलीबाई ॲप’प्रकरणी
तरुण बेंगळूरुमधून ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः ‘बुलीबाई ॲप’ प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका २१ वर्षांच्या तरुणाला सोमवारी बंगळूरुमधून ताब्यात घेतले.
याप्रकरणी त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘बुलीबाई ॲप’संदर्भात सायबर पोलिसांना तीन ट्विटर हँडल मिळाले होते. त्यांची माहिती पोलिसांनी ट्विटरकडे मागितली होती. मुंबई पोलिसांनी गुगलला संपर्क साधल्यानंतर ‘बुलीबाई ॲप’ गिटहब या डोमेनवरून ब्लॉक करण्यात आले होते. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तरुणाची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यानंतर तरुणाला अटक केली जाण्याची शक्यता आहे.
समाजमाध्यमांवरील महिलांची बदनामी करणाऱ्या ‘बुलीबाई ॲप’ प्रकरणात दिल्ली आणि मुंबईतील पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘बुलीबाई ॲप’वर समाजमाध्यमांवर असलेल्या मुस्लिम महिलांची छायाचित्रे ‘बुलीबाई ऑफ द डे’ म्हणून प्रसारित केली जात होती. त्यानंतर त्या छायाचित्रांवर दिवसभर आक्षेपार्ह टीका-टिप्पणी केली जात होती. आजवर अशा सुमारे १०० मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात आले आहे.