दरोडा टाकणारी आठ जणांची टोळी गजाआड
नालासोपारा, ता. ४ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत गुजरात मार्गावर हवा तपासण्यासाठी उभ्या असलेल्या कंटेनरवर दरोडा टाकणाऱ्या आठ जणांच्या टोळीला सोमवारी (ता. ३) अटक करून वसई न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरोडा टाकून या टोळीने कंटनेरचालकाला कारमध्ये बसवून कंटेनर पळवला होता. मुदसर रहेमान (३०), आत्ताउर सिद्दिकी (३९), जावेद हजीज (३१), इजाहार मुस्तफा (३६), शेख मुनीर (२४ सर्व रा. मालेगाव), मोहम्मद राजू शेख (३८), सादिक हसन (२७), रशीद फारुखी (४३, सर्व रा. भिवंडी) अशी आरोपींची नावे आहेत.
३१ डिसेंबरच्या रात्री १० च्या सुमारास खानिवडे टोलनाक्यापासून ५०० मीटर अंतरावर हवा तपासण्यासाठी उभा असलेल्या कॉपरच्या कंटेनर चालकाला जबदस्तीने धमकावून चौघांनी त्याला कारमध्ये बसवले. त्यानंतर टोळीतील एकाने ८४ लाख तीन हजार किमतीचा कॉपरने भरलेला ट्रक घेऊन तेथून धूम ठोकली. याप्रकरणी विरार पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखा कक्ष- ३ विरारचे प्रभारी पीआय प्रमोद बडाख यांच्या पथकाने तपास करून पाच आरोपींना मालेगाव आणि तीन आरोपींना भिवंडी येथून अटक केली.