रिपेअर बोर्डाच्या रहिवाशांचे दैवतांना साकडे घालून आंदोलन
मालाड, ता. ४ (बातमीदार) ः मालवणीतील गायकवाडनगर येथील रिपेअर बोर्डत्या रहिवाशांनी काल (ता. ३) पासून आंदोलन छेडले आहे. कोणीच वाली उरला नसल्याने रहिवासी आपापल्या दैवतांना साकडे घातले आहे.
म्हाडाने ६ ते ८ लाखांची थकबाकी वसूल करण्याची नोटीस पाठविली आहे. या लाखो रुपयांच्या नोटिशी बघून नागरिक हतबल झाले आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या या नागरिकांना म्हाडाने न्याय द्यावा, अनेक वर्षांपासून राहणाऱ्यांना म्हाडाने योग्य दंड आकारून सवलतीच्या दरात खोली अलॉट करावी, यासाठी रहिवाशांनी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भेटीही घेतल्या आहेत. तसेच मालवणी विभाग अल्पसंख्याकबहुल विभाग असल्याने या विषयाकरिता महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगासही निवेदन देण्यात आले आहे; तरी कोठेच योग्य न्याय मिळत नसल्याने आता रहिवाशांनी आपापल्या दैवतांना साकडे घालण्याचे योजिले आहे. त्याची सुरुवात दिनांक ३ जानेवारीपासून प्रार्थना, कुराण पठण करून करण्यात आली आहे. दर आठवड्यातून दोन वेळा विविध धार्मिक पूजाअर्चा करून न्याय मिळण्याकरिता तसेच लोकप्रतिनिधींच्या मनात रहिवाशांप्रति दया निर्माण व्हावी व प्रश्न सुटावा, यासाठी हे आंदोलन करत आहोत, असे गायकवाडनगर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी सांगितले.
...