बेशिस्त रिक्षाचालकांचा प्रवाशांना त्रास
कांदिवली स्थानकातील समस्या; कारवाईची मागणी
कांदिवली, ता. ४ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील रेल्वे पुलाच्या पायऱ्यांना खेटूनच बेशिस्तपणे रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
कांदिवली एस. व्ही. रोडकडून नारायण जोशी, एक दिशा अरुंद मार्ग स्टेशनकडे जातो. त्रिकामदास मार्ग हा एकदिशा मार्ग स्टेशनकडून पश्चिमेला जातो. या मार्गावर विविध राजकीय पक्षांचे रिक्षा थांबे आहेत. मार्ग अरुंद, त्यात रिक्षा थांबे, यामुळे बेशिस्त रिक्षाचालक लवकर भाडे मिळविण्यासाठी चक्क पायऱ्यांना खेटून उभ्या-आडव्या रिक्षा उभ्या करतात. यामुळे तिकिटांसाठी जाणाऱ्या तसेच ये-जा करणाऱ्या प्रवाशांना, विशेष करून ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सायंकाळी धक्काबुक्की करीत रिक्षाच्या अडचणींमधून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
...
बेशिस्त रिक्षाचालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवीत दादागिरी करतात. प्रशासनाने कठोर कारवाई करून नव्या वर्षात प्रवाशांना दिलासा द्यावा, ही अपेक्षा आहे.
- संजय सावंत, रेल्वे प्रवासी
...
स्टेशन परिसरात नेहमीच गस्त असते. बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येईल.
- बाळासाहेब बनकर, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग
...