राज्य उत्पदान विभागाची धडक कारवाई
डिसेंबरमध्ये एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत
ठाणे, ता. ४ ः डिसेंबर महिन्यात ठाणे राज्य उत्पादन विभागाने राबविलेल्या कारवाईत ३८३ गुन्हे दाखल करण्यात आले आहत; तर २४७ आरोपींना अटक करण्यात आली असून ९८ लाख दोन हजार ९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाने दिली आहे. तसेच या विभागाकडून करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे यंदाच्या वर्षी नवीन वर्षाचे स्वागत शांततेत व कुठलीही तक्रार प्राप्त न होता पार पडली असल्याचेही राज्य उत्पादन विभागाकडून सांगण्यात आले.
नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने कुटुंबीय, मित्रमंडळी एकत्र येऊन मासळी, चिकन, मटणावर ताव मारत असतात; तर अनेक जण ओली पार्टीदेखील करीत असतात. त्यामुळे या दिवशी ठाणे जिल्ह्यात बेकादशीररीत्या परराज्यातील बनावट मद्यविक्रीसाठी बाजारात दाखल होत असते. याची गांभीर्याने दखल घेत, ठाणे राज्य उत्पादन विभागाच्या वतीने दक्षता घेण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे राज्य उत्पादन विभागाचे अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विविध भागात पाच भरारी पथके तैनात करण्यात आली होती. या पथकांमध्ये एक निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक तीन शिपाई आणि एक वाहनचालक यांचा समावेश आहे. या पथकांमार्फत अवैध मद्यविक्रीसह वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. रात्रीची गसत घालणे आदी कामे पथकाकडून करण्यात आली. गावठी दारूची विक्री करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते.
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस नाताळ आणि त्यानंतर थर्टीफर्स्ट या दोन दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते; मात्र या काळात जिल्ह्यात कुठेही अवैझ मद्याबाबतची तक्रार प्राप्त झाली नव्हती.
- नीलेश सांगाडे, अधीक्षक, ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभाग