शेअर बाजारात दुसऱ्या दिवशीही तेजी
सेन्सेक्समध्ये ६७२ अंशांची; तर निफ्टीत १७९ अंशांची वाढ
नवी दिल्ली, ता. ४ ः आज शेअर बाजारातील वाढ सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. सेन्सेक्स ६७२ अंशांच्या वाढीबरोबर ५९,८५५ वर स्थिरावला; तर निफ्टी १७९ अंशांनी वाढून १७,८०५ वर बंद झाला. दोन दिवसांत सेन्सेक्सची १६०० अंशांनी वाढ झाली आहे.
आज सेन्सेक्सने १६० अंशांच्या वाढीबरोबर ५९,३४३ अशी सुरुवात केली होती. दिवसभरात सेन्सेक्सने ५९,९३७ चा उच्चांकी; तर ५९,०८४ चा निचांकी स्तर गाठला. सेन्सेक्सच्या ३० पैकी फक्त सहा शेअर्समध्ये घसरण झाली; तर २४ स्टॉक वाढीसह बंद झाले. पॉवरग्रिड, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, टायटन, रिलायन्स, बजाज फायनान्स या शेअर्समध्ये वाढ झाली. याबरोबरच बजाज फिनसर्व, आयटीसी, अॅक्सिस बँक, टाटा स्टील आणि नेस्ले या शेअर्सनीसुद्धा वाढ नोंदवली.
तर इन्फोसिस, डॉ. रेड्डी, इंडसइंड बँक आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. ही घसरण एक टक्क्यापेक्षा कमी आहे. सेन्सेक्सचे अप्पर सर्किट ५७६ आणि लोअर सर्किट २२६ नोंदवण्यात आले. म्हणजे एका दिवसात सेन्सेक्सची वाढ यापेक्षा जास्त किंवा कमी होणार नाही. आज लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅप २७१.३७ लाख कोटी इतका नोंदवण्यात आला.
दरम्यान, निफ्टी १७९ अंशांनी वाढून १७,८०५ वर बंद झाला. दिवसभरात निफ्टीच्या शेअर्सनी १७,८२६ चा उच्चांकी; तर १७,५९३ चा निचांकी स्तर गाठला. निफ्टीच्या ५० पैकी ३५ शेअर्समध्ये वाढ; तर १५ शेअर्समध्ये घट झाली. एनटीपीस, पॉवरग्रीड, महिंद्र अँड महिंद्र, ओएनजीसी या शेअर्समध्ये वाढ झाली; तर टाटा मोटर्स, कोल इंडिया, विप्रो या शेअर्समध्ये घसरण झाली.