विद्युत वाहिनी शेतकऱ्यांसाठी ‘शाप’
प्रकल्पामुळे सुपीक जमिनी पडीक
वाडा, ता. ५ (बातमीदार) ः पालघर आणि ठाणे हे शेतिप्रधान जिल्हे आहेत. येथील बहुतांश नागरिक हे शेतीवरच अवलंबून आहेत; मात्र याच जिल्ह्यातून रिलायन्स कंपनीची इथेन पाईपलाईन व अतिउच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असल्याने शेतकऱ्यांना भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून हे प्रकल्प जात असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
इथेन वाहिनी दहेज (गुजरात) येथून नागोठणे (महाराष्ट्र) अशी जात आहे. यात पालघर व ठाणे हे दोन जिल्हे बाधित होत आहेत; तर अतिउच्च दाबाची विद्युत वाहिनी प्रस्तावित असून ही ४०० केव्हीची विद्युत वाहिनी कुडूस, पडघे, तारापूर अशी जाणार आहे. तालुक्यातून सध्या महापारेषणची २०० केव्ही विद्युत वाहिनीचे काम सुरू आहे. हे असे असतानाच आणखी दोन प्रकल्प पुढे येऊ घातल्याने शेतकरी भूमिहीन होणार आहे.
यापूर्वी उच्च दाबाच्या तीन विद्युत वाहिन्या, गेल गॅस वाहिनी, रिलायन्स गॅस वाहिनी यामुळे शेतकरी बाधित झाले आहेत; मात्र आता पुन्हा रिलायन्स इथेन वाहिनी व अतिउच्च दाबाची विद्युत वाहिनी येथून जाणार आहे. त्यासाठी हरकत अथवा आक्षेप नोंदवण्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
तालुक्यात औद्योगिकीकरण झाल्याने जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. असे असताना फक्त किरकोळ नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळते. यामुळे शेतकरी प्रचंड नाराज आहेत. ज्या जमिनीतून प्रकल्प गेला आहे ती जमीन विकायची असेल तर भाव कमी मिळतो. शिवाय पाईपलाईन जेथून गेली आहे. तेथे बांधकाम करता येत नाही किंवा कूपनलिका मारता येत नाही. तसेच जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर इतर हक्कात रिलायन्स कंपनीचे नाव लागते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.
कोट...
यापूर्वी आमच्या जमिनीतून दोन विद्युत वाहिन्या; तर रिलायन्स कंपनीची गॅस वाहिनी गेली आहे. सद्यस्थितीत तिसऱ्या महापारेषणच्या वाहिनीचे काम सुरू आहे. आता आणखी रिलायन्स इथेन वाहिनी व अतिउच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असल्याचे समजते आहे. आमची जमीन सरकारने आंदण ठेवली आहे काय, असा आमचा सवाल आहे.
शैलेश पाटील, शेतकरी, घोणसई
एकाच जागेतून नेहमीच पाईपलाईन किंवा विद्युत वाहिन्या नेऊन मौल्यवान जमिनीचे मूल्य शून्यात येते. सरकारने हे प्रकल्प राबवताना जमिनीखालून नेले पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्यांचेही नुकसान होणार नाही.
- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते
वाडा ः महापारेषणच्या विद्युत मनोऱ्यांचे सुरू असलेले काम.
Attachments area