अपहरण झालेल्या फुलविक्रेत्या मुलीचा शोध लागला
आश्रयास असलेल्या मुलीनेच केले अपहरण
सकाळ वृत्तसेवा,
ठाणे : ता, ४ ः फुलविक्रेत्याच्या १३ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना नौपाडा पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आली आहे. मुलीने दाखिवलेल्या चातुर्याने आणि नौपाडा पोलिसांच्या प्रयत्नाने तिची सुटका झाली आहे. नौपाडा पोलिसांनी या मुलीला दिल्लीहून विमानाने ठाण्यात आणले. आता ज्योतीचा शोध मात्र सुरु असल्याची माहिती नौपाडा पोलीसांनी दिली.
१३ वर्षीय मुलगी ही तिचे आई- वडील आणि तीन भावंडांसोबत कळवा येथील भास्करनगर भागात राहते. सध्या शाळा बंद असल्याने ही मुलगीही तिच्या आई-वडिलांना फुल विक्रीच्या व्यवसायामध्ये मदत करत होती. २९ डिसेंबर २०२१ ला ती फुलविक्री करत असताना अचानक बेपत्ता झाली. तिच्या आई वडीलांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती परिसरात आढळून आली नाही. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान हा प्रकार नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
यावेळी त्या मुलीच्या आई- वडिलांची चौकशी केली असता, त्यांच्या घरी दोन ते तीन दिवसांपूर्वी दिल्लीहून ज्योती ही तरुणी आश्रयाला असल्याचे समोर आले. मुलगी आणि ज्योतीही एकाच दिवशी गायब झाल्याची माहिती पोलिसांना दिली. रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. तसेच हमालांची चौकशी केली. त्यावेळी एक लहान आणि मोठी मुलगी फलाटावर दिसल्याचे त्या हमालाने पोलिसांना सांगितले. त्या दिवशी दिल्लीला गेलेल्या रेल्वे गाड्यांची माहिती पोलिसांनी मिळविली. दिल्ली पोलिसांनाही या घटनेची माहिती तात्काळ दिली.
१ जानेवारीला अचानक मुलीच्या वडिलांच्या मोबाईल क्रमांकावर दिल्लीतील एका व्यक्तीच्या मोबाईलवरून फोन आला. त्या व्यक्तीने तुमची मुलगी दिल्ली येथील द्वारका भागात असल्याची माहिती दिली. त्यानंतर तो व्यक्ती तिला तात्काळ दिल्ली येथील द्वारका पोलीस ठाण्यात घेऊन गेला. मुलीच्या वडिलांनीही याची माहिती नौपाडा पोलिसांना दिली. मुलीच्या आई-वडिलांची ओळख पटविण्यासाठी द्वारका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना नौपाडा पोलिसांना व्हिडीओ कॉल केला. मुलीने हेच आपले आई-वडिल असल्याचे सांगितल्यानंतर द्वारका पोलिसांनी तिचा ताबा घेतला. संजय धुमाळ यांनी तात्काळ तीन अधिकाऱ्यांना विमानाने दिल्लीला पाठविले. पोलिसांनी मुलीचा ताबा घेतल्यानंतर ज्योतीसोबत ती कोणत्या हॉटेल तसेच ठिकाणी वास्तव्यास होती याची माहिती घेतली. मात्र ज्योती पोलिसांना आढळून आली नाही. मंगळवारी पोलिसांनी या मुलीला विमानाने पुन्हा ठाण्यात आणले.