रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
जगजीवनराम रुग्णालयात ४९ जणांवर उपचार सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी चालविणारे कर्मचारीदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात सध्या ४९ कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाचा थैमान वाढत गेल्याने एप्रिल २०२० मध्ये पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. मध्यंतरीच्या काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने रुग्णालयावरील ताण कमी झाला होता; मात्र डिसेंबरपासून पुन्हा जलदगतीने रेल्वे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. डिसेंबरमध्ये जगजीवनराम रुग्णालयात १९ कोरोना रुग्ण उपचार घेत होते. आता हा ४९ वर पोहचला आहे. काही कर्मचारी बाहेरील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रसासनाचीही चिंता वाढली आहे.
--------------
आमच्याकडे कोरोना किटच नाही!
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी आम्हाला कोरोना किट देण्यात आले होते; मात्र आता पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना अद्याप मास्क, सॅनिटायझेर, ॲप्रोन मिळाला नाही, अशी तक्रार रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली आहे.
----------–----
बायोमेट्रिक हजेरी सुरू
रेल्वेमध्ये सर्वत्र बायोमेट्रिक हजेरी बंद असूनदेखील लोअर परळ, महालक्ष्मी, माटुंगा वर्कशॉपमध्ये बायोमेट्रिक हजेरी सुरूच आहे. त्यामुळे संसर्ग होण्याची भीती असल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने बायोमेट्रिक हजेरी बंद करावी, अशी मागणी पश्चिम रेल्वे मजदूर संघाचे मुंबई अध्यक्ष किरण पाटील यांनी केली आहे.