म्हाडाच्या भरती परीक्षेचे
सुधारित वेळापत्रक लवकरच
एमपीएससी परीक्षेमुळे सहा सत्रांतील परीक्षा पुढे ढकलल्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. आयोगाच्या आणि म्हाडा भरती परीक्षा एकाच दिवशी आल्याने समस्या निर्माण झाली होती. अनेक उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. उमेदवारांना दोन्ही परीक्षा देता याव्यात, यासाठी म्हाडाने २९ व ३० जानेवारी रोजी सहा सत्रांमध्ये आयोजित केलेली ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलली आहे. या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध १४ संवर्गांतील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी जीए सॉफ्टवेअर या कंपनीची निवड करण्यात आली होती. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गुप्ततेचा भंग करत पेपर फोडण्याचा कट रचल्याचे समोर येताच म्हाडाने १२ ते २० डिसेंबरदरम्यान आयोजित केलेली परीक्षा रद्द केली. त्यानंतर म्हाडाने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीची निवड केली. त्यानुसार १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या कंपनीमार्फत विविध भरती परीक्षांची कामे सुरू असल्याने म्हाडाने या परीक्षा २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, एमपीएससीने परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० संयुक्त पेपर क्रमांक १ हा २९ जानेवारी रोजी व पोलिस उपनिरीक्षक पेपर क्रमांक २ हा ३० जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. या उमेदवारांना एमपीएससी व म्हाडा भरती परीक्षा या दोन्ही परीक्षा देण्यास अडथळा येऊ नये, याकरिता म्हाडा प्राधिकरणाने क्लस्टर ६ मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गांकरिता २९ व ३० जानेवारी या दिवशी सहा सत्रांमध्ये होणारी ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
उर्वरित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार
परीक्षेचे सुधारित वेळापत्रक म्हाडा संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. उर्वरित क्लस्टरमधील परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे.