अकरावीच्या ८७ हजार जागा रिक्त
नव्याने सुरू झालेल्या, नामांकित नसलेल्या महाविद्यालयांचा समावेश
मुंबई, ता. ५ : मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व अमरावती येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील शेवटची फेरी संपली. त्यानंतर एकट्या मुंबई विभागात तब्बल ८७ हजार ३६२ म्हणजेच २७.१५ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त राहिलेल्या जागांमध्ये नव्याने सुरू झालेल्या आणि नामांकित नसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना दहावीच्या वर्गात मिळालेल्या गुणवत्तेच्या आधारावर अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवून त्यासाठीचे प्रवेश दिले जावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले असताना, त्या आदेशाला यंदा हरताळ फासत शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रवेशाच्या नावाखाली तब्बल आठ प्रवेश फेऱ्या या गैरमार्गाने करत काही नामांकित महाविद्यालयांचे उखळ पांढरे केले. त्यातच ही प्रवेश प्रक्रिया संपलेली असताना काही विद्यार्थ्यांनी मागणी केली म्हणून मुंबई विभागात २०५ विद्यार्थ्यांसाठी नुकतीच एक विशेष फेरी राबवली आणि त्यात सर्वांना प्रवेश देण्यात आल्याचा दावा शिक्षण संचालनालयाने आपल्या संकेतस्थळावर केला आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व अमरावती या महानगर क्षेत्रात यंदा अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेऱ्या, एक विशेष फेरी आणि त्यानंतर काही महाविद्यालयांना गैरमार्गाने प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्त्वानुसार ७ टप्प्यांमध्ये फेऱ्या राबवण्यात आल्या होता. याच फेऱ्यांमध्ये मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक प्रवेश झालेले असल्याने या प्रवेशाची चौकशी करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे, तर शिक्षक आमदार नागो गाणार यांनीही याविषयी संबंधित कंपनी आणि महाविद्यालयांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.
...
मुंबई विभागातील आकडेवारी
प्रवेशाच्या उपलब्ध जागा ३, २१,७८०
ऑनलाईन प्रवेशासाठी आलेले अर्ज २,५५,२५२
एकूण झालेले प्रवेश २,३४, ४१८ (९१.८४ टक्के)
एकूण रिक्त राहिलेल्या जागा ८७,३६२ (२७.१५ टक्के)
प्रवेश न घेतलेले विद्यार्थी २०,८३४ (८.१६ टक्के)
...