राज्यातील १७० निवासी डॉक्टरांना कोविडसंसर्ग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या तिपटीने वाढत असून तिसऱ्या लाटेचा प्रभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच पुन्हा एकदा हेल्थ वर्कर आणि डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.
राज्यात आज संध्याकाळपर्यंत साधारण १७० निवासी डॉक्टरांना कोविडची लागण झाली. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात आतापर्यंत ५१ निवासी डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. पालिकेच्या केईएमसह नायर रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचारी पॉझिटिव्ह सापडत आहेत.
दरम्यान, नायर रुग्णालयातील अॅकेडेमिक अधिष्ठाता यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यासह अनेक डॉक्टर आणि परिचारिकाही पॉझिटिव्ह आल्या आहेत.
राज्यातील २० सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत निवासी डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात येऊ लागले आहेत. अवघ्या ४८ तासांत १७० निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये जे. जे. रुग्णालयातील ५१, सायनच्या ३५, केईएमच्या ४०, नायरच्या ३५ आणि कूपरच्या सात डॉक्टरांचा समावेश आहे.
कोट
जे. जे. रुग्णालयातील ५१ डॉक्टरना कोविडचा संसर्ग झाला आहे. राज्यात १७० हून अधिक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
- डॉ. अविनाश दहिफळे, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर, महाराष्ट्र