पनवेलमधील तीन गावांतील वर्गखोल्यांची पुनर्बांधणी
एक कोटी ६० लाखांचा खर्च अपेक्षित; महासभेत निर्णय होणार!
पनवेल, ता. ५ (प्रतिनिधी) ः महापालिका क्षेत्रातील ३ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये नव्या वर्ग खोल्या बांधण्यात येणार आहेत. यासाठी एक कोटी ६० लाख रुपयांचा अंदाजित खर्च आहे. सरकारकडून एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित ६० लाख रुपयांचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता.७) आयोजित महासभेत या बाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांसोबत समाज मंदिराच्या बांधकामाचा व वाढीव बांधकामाचा प्रस्ताव देखील महासभेसमोर मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. पनवेल महापालिकेत समाविष्ट ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा हस्तांतराचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी काही अटी शर्थींवर शाळा हस्तांतरित करून घेण्याची तयारी दर्शवली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडून मात्र या बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने हस्तांतराचा मुद्दा प्रलंबित आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा भरविण्यासाठी वापरात असलेल्या काही वास्तूमधील वर्ग खोल्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे. पालिका प्रशासनाने दुरुस्तीची गरज असलेल्या वर्ग खोल्यांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील वलवली गावातील प्राथमिक शाळेच्या तीन वर्गखोल्या बांधण्यात येणार असून, यासाठी अंदाजित ३७ लाख ८८ हजार ८९५ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तर भिंगारी येथील प्राथमिक शाळेच्या चार वर्ग खोल्यांसाठी ५१ लाख १५ हजार ३००, मुर्बी येथील प्राथमिक शाळेतील ३ वर्ग खोल्यांसाठी ३७ लाख ८८ हजार ८९५ रुपये खर्च अपेक्षित आहे.
समाजमंदिरासाठी १८ लाख ३७ हजार
कोयना वेळ येथील प्राथमिक शाळेजवळ समाज मंदिर बांधण्यासाठी १८ लाख ३७ हजार ४०५ रुपये व कळंबोलीमधील कालभैरव मंदिरासमोरील सभागृहाच्या वाढीव बांधकामाकरिता ७ लाख २३ हजार ४०५ रुपयांचा खर्च अंदाजित पकडण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या महासभेत मांडण्यात येणार आहे.