प्रतिष्ठित क्रमांकाची नवी मुंबईकरांना भुरळ
वर्षभरात आरटीओला ३ कोटी ५३ लाख ७४ हजारांचे उत्पन्न
वाशी, ता. ५ ( बातमीदार) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यांनतर जून २०२१ महिन्यापासून अनलॉक करण्यास सुरुवात झाली. मात्र कोरोनामध्ये बस, रिक्षांनी प्रवास करण्यास कर्मचारी तयार नव्हते. यामुळे स्वतःचे वाहन घेण्याला अनेकांनी पसंती दिली. वाहन घेतल्यानंतर प्रतिष्ठेचा असणारा नंबर घेण्याकडे नवी मुंबईकरांचा कल असल्याचे दिसून आले.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत जवळपास २ हजार ५९४ वाहनांनी व्हीआयपी नंबर घेतला असून त्यामधून नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहनच्या तिजोरीत २ कोटी ३५ लाख ४० हजार पाचशे रुपये जमा झाले आहे. तर जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत ३ हजार ६३७ वाहनांनी व्हीआयपी नंबर घेतला असून त्यामधून ३ कोटी ५३ लाख ७४ हजार इतकी रक्कम आरटीओच्या तिजोरीत जमा झाली आहे.
२०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये व्हीआयपी नंबरच्या मागणीत वाढ झाल्याने आरटीओच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. कोरोना काळात अनेकांनी व्हीआयपी नंबर घेतल्याचे दिसून येत आहे. व्हीआयपी नंबरसाठी सरकारकडून अतिरिक्त शुल्क आकारणी केली जात असली तरी नवी मुंबईत व्हीआयपी नंबर घेण्याकडे चालकाचा कल दिसून येत आहे.
व्हीआयपी नंबर घेताना अंकाची बेरीज करून येणारी संख्या लकी नंबर असावी, याकडे अनेकांचा कल असतो. आधीचे वाहन लकी लागल्यास त्याच वाहनांचा नंबर पुन्हा घेण्यासाठी आरटीओकडे मागणी करण्यात येते. कोरोना काळात वाहनांची विक्री घटली असली तर व्हीआयपी नंबर घेण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.
- हेमांगिनी पाटील, अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन
बॉक्स
व्हीआयपी नंबर किंमत
१ चारचाकी चार लाख दुचाकी पन्नास हजार
९,९९,७८६,९९९,९९९९ चारचाकी एक लाख पन्नास हजार, दुचाकी वीस हजार
२,३,४,५,६,७,८,१०,११,२२,३३,४४,५५,६६,७७,८८ चारचाकी पन्नास हजार, दुचाकी दहा हजार