चेंबूर पश्चिम विभागात कोरोना रुग्णांत वाढ
चेंबूर, ता. ५ (बातमीदार) ः मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. चेंबूर एम पश्चिम विभागात दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सध्या चेंबूर एम पश्चिम, टिळकनगर, कुर्ला, चुनाभट्टी, नेहरूनगर, एल वार्ड, एम पूर्व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चेंबूर एम पश्चिम विभागात सोमवारी (ता. ३) रुग्णसंख्या एकूण २५० होती. मंगळवारी (ता. ४) ३५० होती. आज (ता. ५) ती ५५० झाली आहे. कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आजपासून वाशी नाका परिसरातील मेटल बॉक्स या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले असून सध्या रुग्णांना या कोविड सेंटरमध्ये भरती केले जात आहे. ‘कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा. सॅनिटाईजर वापरावा. ताप, सर्दी खोकला आल्यास निष्काळजीपणा करू नये. ओमिक्रोनचा धोका होणार नाही, अशा भ्रमात राहू नये. दोन डोस घेणाऱ्यांनाही याची लागण होऊ शकते. व्याधी असणारे व वयोवृद्ध यांनी चाचणी करून लगेच उपचार करून घ्यावेत, सोशल डिस्टन्सिंग पाळावे,’ असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.भूपेंद्र पाटील यांनी केले आहे.
...