बहाडोलीच्या खाडी पुलाची दुरुस्ती
रात्री १० ते पहाटे चार वाजेपर्यंत वाहतूक बंद
मनोर, ता. ५ (बातमीदार) ः वैतरणा खाडीवरील बहाडोली येथील अरुंद पुलावरील रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. अरुंद रस्त्यांमुळे एकेरी वाहतूक असलेल्या पुलावर खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून सिग्नल यंत्रणेचा बोजवारा उडत होता. वाहन चालकांची गैरसोय निर्माण होत असल्याने पुलावरील रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली जात होती. अखेर वसई-विरार महापालिकेला दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त सापडला आहे. शुक्रवारी रात्री पुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. रात्री १० ते पहाटे चार वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे.
मनोर-पालघर रस्त्यावरील मनोर बाजारपेठेतील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून वसई- दहिसर- धुकटन रस्त्याचा वापर केला जात आहे. या रस्त्यावरील प्रवासामुळे अंतर आणि वेळेची बचत होत असल्याने मुंबई-ठाणे भागातून जिल्हा मुख्यालयाकडे जाणारे सनदी अधिकारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. बहाडोली येथील वैतरणा नदीच्या खाडी पुलावरील रस्ता अरुंद असल्याने एकेरी वाहतूक होते. त्यामुळे पुलावर वाहतूक नियमनासाठी वसई-विरार महापालिकेमार्फत स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे.
पुलावरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सुरुवातीला आणि पुलाच्या मध्यभागातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पुलावर वाहनांचा वेग मंदावत आहे. त्यामुळे पुलावरील स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचा बोजवारा उडून वाहनचालकांची गैरसोय निर्माण होत आहे.
पुलावरील रस्ता सिमेंट काँक्रीटचा असल्याने दुरुस्तीनंतर किमान चार तास वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री दहापासून पहाटे चारपर्यंत दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन वसई विरार महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
- सौरभ वर्तक, कनिष्ठ अभियंता, वसई-विरार महापालिका.