दोन सोनसाखळी चोरांना अटक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ ः सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने या गुन्ह्यांची उकल करण्याकडे पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांनी तब्बल ५० सीसीटीव्ही फुटेज तपासात १० गुन्ह्यांची उकल केली. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, आरोपींचे कपडे, शूज याआधारे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून मनोजकुमार ठाकूर व विकेश तिवारी, अशी अटक आरोपींची नावे असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.
सोनसाखळी चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश डांबरे, अविनाश वनवे, पोलिस हवालदार राजेंद्र खिलारे, विजय कोळी, प्रवीण किनरे, दीपक गडगे, भारत कांदळकर, महादेव पवार, यल्लप्पा पाटील, अनिल घुगे, दीपक जाधव, महेंद्र मंझा यांच्या पथकाने चोरीच्या घटना घडलेल्या भागात तब्बल ५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. यादरम्यान काळ्या रंगाच्या शाईन बाईकवर वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करताना हे आरोपी आढळून आले होते. त्यांचा शोध घेत असताना दावडी गावात ही मोटरसायकल आढळून आली. त्याआधारे पोलिसांनी विकेश आणि मनोजकुमार यांना अटक केली. त्यांच्याकडून होंडा कंपनीची मोटरसायकल, दोन मोबाईल व सहा लाख ७५ हजार रुपये किमतीचे १३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण सात लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१० गुन्ह्यांची उकल
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी मानपाडा पोलिस ठाण्यातील तीन, टिळकनगर पोलिस ठाण्यातील पाच तसेच डोंबिवली व विष्णूनगर पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण १० गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.