शिरवणेत विद्युत वाहिन्यांची गंभीर अवस्था
वाहिन्या भूमिगत करण्याची स्थानिकांची मागणी
तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : सायबर सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात गावठाणामध्ये जुन्या, जर्जर झालेल्या विद्युत वाहिन्या पाहायला मिळत आहेत. या लटकत्या विद्युत वाहिन्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या परिसरात विद्युत वाहिन्यां भूमिगत करण्याच्या मागणीला जोर धरू लागला आहे.
नवी मुंबई पालिका क्षेत्रात २९ गावांचा समावेश आहे. या पैकी नेरुळ नोडल भागाशेजारी असणारे शिरवणे या गावाचा अंतर्भाव आहे. या गावाच्या दोन्ही बाजूला नोडल भागात विद्युत वाहिन्या सिडकोने हा परिसर विकसित करताना भूमिगत केल्या. पण, शिरवणे गावात आजतागायत विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचा विचार प्रशासनाकडून केला गेला नाही. यामुळे आजही या गावातील विद्युत वाहिन्या खांबावर लटकताना दिसतात. शिरवणे गावातील घराघरात विद्युत जोडणी देणाऱ्या वाहिन्या जुनाट व जर्जर झाल्या आहेत. यामुळे अनेकदा वाहिन्या तुटतात. या कारणाने गावात नेहमीच विद्युत प्रवाह खंडित होण्याची समस्या निर्माण होते. पावसाळ्यात तर वारंवार बत्ती गुल होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. यावर महावितरण किंवा पालिका प्रशासनाने योग्य तो समन्वय साधून उपाय शोधावा व ग्राहकांना त्रासमुक्त करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
कोट
आमच्या गावाच्या आजूबाजूला बघितले तर शहर वाटते. परंतु, गावात प्रवेश केल्यास नक्की गावात आहोत की शहरात असा प्रश्न पडतो. पोलवरील विद्युत वाहिन्यांद्वारे घरात जोडणी दिल्याने अनेकदा त्रासाचा सामना करावा लागतो.
- दिनेश ठाकूर, अध्यक्ष, बेलापूर विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी ओबीसी सेल
कोट
आमचे काम विद्युत पुरवठा करण्याचे आहे. त्याची आम्ही व्यवस्था केली आहे. परंतु, पालिका हे नियोजन प्राधिकरण असल्याने त्यांनी पुढील निर्णय घेऊ शकतात.
- राजाराम माने, अधीक्षक अभियंता, महावितरण