आव्हाडांच्या विरोधात भाजपचा आंदोलनाचा प्रयत्न
ठाण्यातील निवासस्थानाबाहेर पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ ः ठाण्यातील एका कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाजाबाबत कथितरीत्या वादग्रस्त विधान केल्याने त्याचे पडसाद बुधवारी ठाण्यात उमटल्याचे दिसून आले. डॉ. आव्हाड यांनी बुधवारी आपल्या निवासस्थानी पुण्यातून मोर्चा येणार असून पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा, असे ट्विट केले होते. त्यामुळे बंगल्याबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी भाजपच्या ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
विधानावर ठाम असल्याचे आव्हाड यांनी मंगळवारी पुन्हा सांगितले. इतिहास कोणी बदलू शकत नाही असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. सकाळीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांच्या बंगल्यावर धाव घेतली; तर काही महिला पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना पोलिसांनी मज्जाव केला. कॅडबरीपासून ज्युपिटर रुग्णालयापर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी पोलिसांनी बंद केला होता. भाजपच्या ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी हायवेवरून या ठिकाणी येऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. पोलिस त्यांना ताब्यात घेऊन जात असतानाच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी त्यांनादेखील ताब्यात घेतले.
…
कोट
आव्हाड यांनी जे वक्तव्य केले आहे, ते त्यांनी मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. ओबीसी रस्त्यावर उतरलेला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. भाजपमध्येदेखील मोठ्या प्रमाणात ओबीसीचे पदाधिकारी असून ते रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे आव्हाड यांनी माफी मागावी.
- विक्रम भोईर, ओबीसी नेते, भाजप
.....
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे. त्यामुळे आधी त्यांचे भाषण पूर्ण ऐकावे त्यानंतर भाजपवाल्यांनी आंदोलन करावे. विनाकारण आंदोलन करून नागरिकांना वेठीस धरणे अयोग्य आहे.
- सचिन शिंदे, सरचिटणीस, काँग्रेस, ठाणे शहर.
.....
गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठीच्या आंदोलनात दलितांचे मोठे योगदान होते; आता ओबीसींनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मैदानात उतरावे, असे भाष्य केले आहे. त्यांच्या या विधानाशी आम्ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते शंभर टक्के सहमत आहोत.
- नानासाहेब इंदिसे, रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष.