ठाणेकरांचा पहिला दिवस सुटकेचा
शिस्तबद्ध नियोजनामुळे वाहतूक कोंडी टळली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ ः जुना कोपरी पूल बंद झाल्यानंतर ठाणेकरांना दीड वर्षे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची भीती होती. मात्र पूल बंद झाल्याच्या पहिल्याच दिवशी शहरात बुधवारी (ता. ५) कुठेही ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला नाही. वाहतूक शाखेच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणे सुसाट सुरू आहे.
ठाणे आणि मुंबई शहरातील वाहतुकीसाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी उड्डणपूल महत्त्वाचा मानला जातो. या उड्डाणपुलावरून वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेत कोपरी पूल अरुंद ठरत असल्यामुळे २०१८ मध्ये जुन्या कोपरी पुलाच्या बाजूला नवीन मार्गिका तयार करून आता प्रत्यक्ष या उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी हा उड्डाणपूल मंगळवारी (ता. ४) रात्रीपासून वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत हा उड्डाणपूल बंद राहणार असल्याने ठाण्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता होती. पण वाहतूक शाखेने केलेल्या नियोजनामुळे पहिल्याच दिवशी वाहनांना कोणताही अडथळा आला नाही.
वाहतूक सुरळीत सुरू रहावी यासाठी कोपरी व वागळे येथे वाहतूक शाखेचे दोन वरिष्ठ अधिकारी १२ तासांच्या ड्युटीवर तैनात ठेवण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे ४० कर्मचारीही ठाण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर नियुक्त करण्यात आले आहेत. या शिवाय एमएमआरडीएकडून १०० वॉर्डन वाहतूक शाखेला मिळाले आहेत. येथे सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ या तीन शिफ्टमध्ये हे वॉर्डन कोपरी आणि नौपाडा येथे तैनात ठेवण्यात आले आहेत. हे सर्व पथक कोपरी-गुरुद्वारा-भास्कर कॉलनी ते हरि ओम नगरपर्यंतच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करत आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये कोणताही गोंधळ न उडता ते इच्छित मार्गावर प्रवास करत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.