कोका-कोला कंपनीविरोधात कामगारांचे बेमुदत उपोषण
महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू
वाडा, ता.५ (बातमीदार) ः कोका-कोला कंपनी व्यवस्थापन व ठेकेदार यांच्या मनमानी कारभाराविरोधात कामगारांनी आजपासून महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे कामगार व प्रशासन यांचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोका-कोला ही शितपेय बनवणारी कंपनी असून या कंपनीत स्थानिक भूमिपुत्र कामगार गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. ठेकेदाराने कामगारांचे भविष्यनिर्वाह निधीचे पैसे भरलेले नाहीत. पगारही वेळेवर देत नाहीत, अशी कामगारांची तक्रार आहे. १५ वर्षे काम करून कामावर घेत नाहीत. सांगायला गेल्यावर दमदाटी करतात. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, बी ग्रुपच्या कामगारांची आवश्यकता असलेले शुगर डम्पिंग व पल्प कटिंग हे दोन विभाग क्रोनल सिस्टममध्ये यावेत, नोव्हेंबर २०२१ चा पगार मिळावा, तसेच डिसेंबर २०२१ मध्ये कामावर बोलवून परत पाठवले त्या २५ दिवसांचा पगार मिळावा, बी ग्रुपमधील २६ कामगारांना कायमस्वरूपी करावे, पगार स्लिप २ वर्षांच्या दिलेल्या नाहीत, त्या तत्काळ देण्यात याव्यात, तीन महिने काम केलेले ७ सुट्ट्या बाकी आहेत, त्या देण्यात याव्यात, कोविड काळातील १९ महिन्यांचा पगार देण्यात यावा, मागील तीन वर्षांपासूनचे बुट व कपडे दिलेले नाहीत ते द्यावेत, वरील मागण्या मान्य नसतील तर अंतिम हिशोब देणी तत्काळ द्यावीत, आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला २४ कामगार बसले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, असे कामगार संघटनेचे उपाध्यक्ष जितेश पाटील यांनी म्हटले आहे.