विरार अलिबाग बहूउद्देशिय मार्गाला जमिनी देण्यास उरणच्या शेतकऱ्यांचा विरोध

विरार अलिबाग बहूउद्देशिय मार्गाला जमिनी देण्यास उरणच्या शेतकऱ्यांचा विरोध

विरार-अलिबाग बहूउद्देशिय मार्गाला जमिनी देण्यास विरोध जमिनीचा योग्य मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी उरण, ता. ५ (वार्ताहर) ः विरार-अलिबाग बहुउद्देशिय मार्गाला जमिनी देण्यास उरणच्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली उरण पंचायत समिती सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस शेतकऱ्यांनी जोपर्यंत या प्रकल्पाची संपूर्ण माहिती आणि जागेचा योग्य मोबदला मिळण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. एमएसआरडीसीकडून विरार-अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका (मल्टीमॉडल कॉरिडॉर) हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या १२६ कि.मी. लांबीच्या मल्टिमॉडल कॉरिडॉरमध्ये मेट्रो, महामार्ग तसेच सर्व्हिस रोड अशा सुविधा असणार आहेत. बहुउद्देशिय वाहतूक मार्गिकेत मुंबई, विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि उरण इत्यादी भागाचा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. या मार्गिकेमुळे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, एमटीएचएल आणि डीएफसी जोडले जाणार आहेत. या मार्गिकेतील नवघर ते चिरनेर हा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सध्या भूसंपादन आणि सर्वेक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उरण तालुक्यातील बैलोंडाखार, दिघोडे, वेश्वी, जांभूळपाडा, गावठाण, जासई, भोम, चिखली भोम, चिरनेर, टाकीगाव, हरिश्चंद्र पिंपळे, नवापाडा, विंधणे, कळंबुसरे आणि कोळी बांधणखार या १६ महसुली गावांतील जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत. या प्रकल्पासाठी सर्वेक्षण आणि मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हुसकावून लावल्यानंतर शेतकऱ्यांना हा प्रकल्प समजावण्यासाठी उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. ------------------- विकासाला विरोध नाही या बैठकीत आपला विकासाला विरोध नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. पण आम्हाला आमच्या जमिनींचा योग्य मोबदला, प्रकल्पग्रस्त दाखले, येथे होणाऱ्या मेट्रो स्टेशन तसेच इतर आस्थापनांमध्ये नोकऱ्या हव्या आहेत. तसेच, सर्व्हिस रोड, गावातील पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या उपाययोजना हे मुद्दे स्पष्ट केले पाहिजेत. हे केल्याशिवाय आम्ही या प्रकल्पाला जमिनी देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी राहुल मुंडके यांनी शेतकऱ्यांना या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी लवकरच एमएसआरडीसी अधिकाऱ्यांसमवेत एक प्रेझेंटेशन ठेवले जाईल. तसेच जमिनीचा मोबदला म्हणून रेडी रेकनरच्या चारपटपेक्षा अधिक मोबदला देण्यात येईल, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com