सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त चालकांची कंत्राटावर नियुक्ती!
एसटी सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : उच्च न्यायालयाच्या आदेशावरून राज्य सरकारने एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी समिती नेमली असून १२ आठवड्यांनंतर अंतिम अहवाल न्यायालयापुढे ठेवला जाणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ केलेली असतानाही एसटीचे राज्य सरकारात विलीनीकरण व्हावे यासाठी दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी संप ताणून धरला आहे. त्यामुळे एसटीची सार्वजनिक प्रवासी सेवा ठप्प झाली आहे. आता एसटी प्रशासनाने चक्क सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या माजी चालकांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मोठ्या प्रमाणात चालक-वाहक संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे दैनंदिन वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळित झाली आहे. परिणामी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळातील सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ६२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या चालकांना कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्यासाठी बुधवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अशी होईल भरती
- सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या चालकांचे वय ६२ वर्षे पूर्ण होण्यासाठी किमान सहा महिने कालावधी शिल्लक आहे. अशा चालकांची यादी विभाग नियंत्रकांना तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- ६२ वयापेक्षा जास्त वय असलेल्यांना संधी दिली जाणार नाही. त्या चालकांच्या अपघातांच्या नोंदीसुद्धा तपासल्या जाणार आहेत.
- ज्यांच्या नावावर आधीच्या सेवेत अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघाताची नोंद असेल त्यांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत.
--------
कंत्राटी चालकांना मासिक २० हजार मिळणार
कंत्राटी नियुक्त चालकांना २० हजार म्हणजेच दैनिक ७६९ रुपये असा मासिक मेहनताना मिळेल. काम करण्यास इच्छुक असल्याचे लेखी संमती पत्र दिलेल्या चालकांची वैद्यकीय तपासणी मानसेवी अधिकाऱ्यांकडून होईल. वैद्यकीय तपासणी विभागांसाठी नेमलेल्या नेत्रतज्ज्ञांकडून रंगआंधळेपणा व दृष्टिदोष तपासणी करण्यात येईल.