विद्यापीठ, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
शिक्षणासह परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनेच
मुंबई, ता. ५ : राज्यात कोरोनासह ओमिक्राॅन बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील सर्व प्रकारची विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू राहील व परीक्षाही ऑनलाईनच होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली.
कोरोनाचा वाढता संसर्ग व ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ, महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली होती. यात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू सहभागी झाले होते. यात १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळांप्रमाणेच या विद्यार्थ्यांचेही शिक्षण ऑनलाईन सुरू राहणार असून परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. १५ फेब्रुवारीनंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतले जातील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गडचिरोली, जळगाव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट कनेक्टीव्हीटीच्या समस्या आहेत. त्यामुळे येथे ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे सामंत यांनी सांगितले.
तसेच, विद्यापीठांचे प्रशासकीय कामकाज सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक विद्यापीठाने आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे ५० टक्के उपस्थितीनुसारच नियोजन करावे. ५० टक्के प्राध्यापक, शिक्षक, कर्मचाऱ्यांनाच विद्यापीठ, महाविद्यालयात बोलवावे, अशा सूचनाही दिल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
---
वसतिगृहेदेखील बंद
कोरोनाच्या भीतीमुळे सर्व विद्यापीठांमधील वसतिगृहे बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. वसतिगृहांमध्ये केवळ परदेशी विद्यार्थी व संशोधन करत असलेल्या पीएचडीच्या विद्यार्थांना वसतिगृहात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना संसर्ग होणार नाही, याबाबत विद्यापीठ व महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. आवश्यकता भासल्यास वसतिगृहाच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने कोविड केअर सेंटर उपलब्ध करून द्यावे, विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी कॅम्प घ्यावेत, अशा सूचनाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्या आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांना फटका
मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विविध विद्यापीठांच्या वसतिगृहात राहत आहेत; मात्र आता पीएचडी करणारे विद्यार्थी वगळता इतरांसाठी वसतिगृहाची दारे बंद करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना पुन्हा आपल्या गावचा रस्ता पकडावा लागणार आहे. त्यात गावात ऑनलाईन सोयीसुविधाही पुरेशा उपलब्ध नसल्याने त्याचा मोठा फटका त्यांना बसणार आहे.
अडीअडचणीसाठी हेल्पलाईन
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालयांनी हेल्पलाईन सुरू करावी. परीक्षेची कार्यपद्धती, अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच अशा सर्व बाबींबाबत विद्यापीठांनी त्यांच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.