अंजूर मानकोलीत सिमेंट प्लँटमुळे प्रदूषण
डोळे चुरचुरणे, खोकल्याने नागरिक हैराण
भिवंडी, ता. ६ (बातमीदार) ः भिवंडी तालुक्यातील अंजूर मानकोली या भागात बसविण्यात आलेल्या चार सिमेंट प्लँटमुळे परिसरातील ग्रामस्थ नागरिकांना प्रदूषणासह रस्त्यावर येथून होणाऱ्या अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याकडे महसूल प्रशासनासह लोकप्रतिनिधी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. याबाबत तहसीलदारांनी कारवाई करावी यासाठी लेखी तक्रार ग्रामस्थांनी दिली आहे.
भिवंडी तालुक्यातील मौजे अंजूर मानकोली, दिवे अंजूर या ग्रामपंचायत हद्दीत चार सिमेंट प्लँट असून येथील प्लँट चोवीस तास सुरू असतात. येथून सिमेंट रेडी मिक्सरच्या अवजड वाहनांची वाहतूकही चोवीस तास सुरू असते. सिमेंट प्लँटमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे
नागरिकांना खोकला, डोळे चुरचुरणे आदी विकार जडले आहेत. या प्लँटवर योग्य कारवाई केली नाही तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. यासंबंधी लेखी निवेदन येथील मनीष तरे यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना दिले आहे.
येत्या दोन दिवसांत महसूल अधिकाऱ्यांमार्फत घटनास्थळाची पाहणी करण्यात येईल. संबंधित दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- अधिक पाटील, तहसीलदार.