‘तिसरा डोळा’ मान्यतेच्या प्रतीक्षेत
ठाण्यात १४८ सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा,
ठाणे, ता. ६ ः शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी तसेच गुन्हेगारांना पकडण्यासाठी शहरात लावलेले सीसीटीव्ही उपयुक्त ठरत आहेत; मात्र ठाणे शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नगरसेवक निधी आणि स्मार्ट सिटीमधून ठाणे शहरात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे चांगले नसल्याचा अहवाल ठाणे पोलिसांनी दिला आहे. त्याच दरम्यान दुसरीकडे पोलिस प्रशासनाचेच कोट्यवधींचे सीसीटीव्ही बसवण्याचे प्रस्ताव लालफितीत अडकले आहेत.
वाहतूक पोलिसांनी तब्बल ८ ते ९ महिन्यांपूर्वी शहरात १४८ कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार केला होता. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून अडीच कोटींचा निधीदेखील वाहतूक शाखेकडे वर्ग झाला आहे. मात्र, अद्याप हा प्रस्ताव मार्गी लागलेला नाही. दुसरीकडे संपूर्ण ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत पाच परिमंडळमध्ये विविध ठिकाणी तब्बल २ दोन ५०० कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता; मात्र अद्यापही या प्रस्तावालाही मान्यता न मिळाल्याने हा प्रस्तावदेखील मार्गी लागलेला नाही.
शहरात घडणाऱ्या गुन्ह्याच्या तपासाला वेग मिळावा, यासाठी स्मार्ट सिटी तसेच नगरसेवक निधीमधून ठिकठिकाणी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे चांगल्या दर्जाचे नसल्याचेच उघड झाले असून तसा अहवालच ठाणे पोलिसांनी दिला आहे. या कॅमेऱ्यांमधील अनेक महत्त्वाच्या त्रुटी पोलिसांनीच उघड केल्या आहे. त्यामुळे यापूर्वी बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या जागी आता नवीन कंपनीचे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्याची शिफारस ठाणे पोलिसांनी केली आहे.
वाहतूक पोलिसांच्या वतीने मार्च २०२१ रोजी शहरात विविध ठिकाणी १४८ कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मान्यतादेखील मिळाली आहे. विशेष म्हणजे यासाठी लागणार २.५ कोटींचा निधी देखील वाहतूक शाखेकडे वर्ग झाला असून तरीही हा प्रस्ताव लालफितीमध्ये अडकला आहे. दरम्यान, ठाणे शहराच्या अंतर्गत येत असलेल्या परिमंडळ १ आणि परिमंडळ ५ मध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. संपूर्ण परिसराचा सर्व्हे करून कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवता येतील, याची यादी तयार करण्यात आली होती. मात्र त्यानंतर संपूर्ण ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्तावदेखील सरकारच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार तब्बल २५०० पेक्षा अधिक कॅमेरे विविध ठिकाणी बसवण्यात येणार आहेत.
कोट
ठाणे शहरात १४८ कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला असून यामध्ये काही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. सरकारकडून प्रस्ताव मान्य झाल्यानंतर याच्या निविदा काढण्यात येणार असून लवकरच हा प्रस्ताव मार्गी लागेल.
- बाळासाहेब पाटील, पोलिस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा