गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून सावधान
उशिरा निदानाचे प्रमाण ७० टक्के
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस संसर्ग, धूम्रपान, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, वय आणि उच्च-जोखीम लैंगिक वर्तन यांसारख्या काही कारणांमुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. या कर्करोगाबाबत जनजागृती महत्त्वाची असून सध्या या कर्करोगाचे निदान ७० टक्के तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात होत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी स्क्रीनिंग ही सर्वोत्तम पद्धत आहे. पॅप चाचणी ही पॅप स्मीअर म्हणून ओळखली जाते. हे कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आणि मृत्यू आणि विकृती दर कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. २१-६५ वयोगटातील महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर दर तीन वर्षांनी ही चाचणी करून घेणे गरजेचे आहे, असे स्त्री-रोग आणि प्रसूतितज्ज्ञ डॉ. इला त्यागी यांनी सांगितले.
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची बहुतेक प्रकरणे मानवी पॅपिलोमा व्हायरसच्या संसर्गामुळे दिसून येतात. कमी प्रतिकारशक्ती, धूम्रपान, एकापेक्षा जास्त लैंगिक साथीदार असणे, एखाद्याच्या प्रजनन प्रणालीला हानी पोहोचवणाऱ्या क्लॅमिडीयासारख्या लैंगिक संक्रमित रोगांनी ग्रस्त असणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर ही गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची कारणे आहेत.
...
चाचणी करताना...
वयाच्या ३० व्या वर्षापासून मानवी पॅपिलोमा व्हायरससोबत पॅप चाचणी एकत्र केली जाऊ शकते. मात्र मासिक पाळी सुरू असताना पॅप स्मीअर करणे टाळा. कारण जास्त रक्तस्राव तुम्हाला अचूक परिणाम देऊ शकत नाही, असेही त्या म्हणाल्या. चाचणीपूर्वी सेक्स करणे, डाउचिंग करणे, स्नेहक, रासायनिक उत्पादने वापरणे टाळणे गरजेचे आहे.
...
मृत्यूचे प्रमाण जास्त
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाने मृत्यू होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण, इतर कर्करोगापेक्षा जास्त आहे. अजूनही बऱ्याच स्त्रिया या आजाराकडे दुर्लक्ष करतात. अज्ञान व लाज यामुळे डॉक्टरकडे जायची टाळाटाळ करतात. हा कर्करोग शेवटच्या स्टेजला असू शकतो व त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. पण हा कर्करोग प्राथमिक अवस्थेत ओळखता आला तर पूर्ण बरा होऊ शकतो, असे डॉ. वीणा औरंगाबादकर म्हणाल्या.
...
...