मुंबईत तीन हजार कोटींची पाणीचोरी
टँकर माफियांवर कारवाई करण्याची आशीष शेलार यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईकरांच्या पाण्याचा ‘व्यापार’ सुरू असून तीन हजार कोटींचे बेकायदेशीर रॅकेट चालवले जात आहे. त्यामुळे समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी १८ हजार कोटी रुपये खर्च करत असताना मुंबईत होणारी ही प्रचंड मोठी पाणी चोरी रोखावी व टँकर माफियांवरही कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेते व आमदार ॲड. आशीष शेलार यांनी पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.
पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यासोबतच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त सी. डी. जोशी यांनाही आशीष शेलार यांनी पत्र लिहून मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील पाणी चोरी व पाण्याचा होणारा बेसुमार उपसा याबाबत काही गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. यावर एसआयटी नियुक्त करून चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
केंद्रीय भूजल विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई शहरात १९ हजारपेक्षा जास्त पाण्याच्या विहिरी आहेत. १२ हजार ५०० बोअरवेल आहेत. मुंबई महापालिकेने २५१ जलकुंभांना नोटिसा बजावल्या असून त्यापैकी २१६ अवैध जलविहिरी आहेत. यातील एकाच जलकुंभातून ८० कोटी रुपयांची पाणीचोरी झाल्याचे काही प्रसिद्धी माध्यमांनी समोर आणल्याचे आशीष शेलार यांनी म्हटले आहे. यावर कोणतेही नियमन किंवा कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे अवैध पाणी टँकर माफियांचे फावले असून मुंबई विभागात ३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट करत असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईतील बेकायदेशीर व अनियंत्रित पाणी चोरीचा तपास करून त्यांना दंड आकारून ही चोरी थांबवणे आवश्यक असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे.
बेकायदा पाण्याचा उपसा रोखा!
कोणत्याही परवानगीशिवाय पाणी उपसा करणाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करावा. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात पाणी उपसा किती प्रमाणात झाला पाहिजे, याचे धोरण निश्चित करण्यात यावे, अशा मागण्या आमदार ॲड. आशीष शेलार यांनी केल्या आहेत.