‘बीएसयुपी’ सोडतीला स्थगिती नाही
आमदार सरनाईक यांनी केला घोटाळ्याचा आरोप
भाईंदर, ता.६ (बातमीदार): मिरा-भाईंदर महापालिकेच्या बीएसयुपी योजनेतील लाभार्थ्यांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीला स्थगिती देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. सोडतीमध्ये काही बोगस लाभार्थी असल्याने सोडतीला स्थगिती देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे केली होती.
काशी-मिरा भागातील झोपडपट्टीवासीयांसाठी महापालिका बीएसयुपी योजना राबवत आहे. या योजनेतील २९४ घरांचे वाटप करण्यासाठी महापालिकेने चार महिन्यापूर्वी महापौर ज्योत्स्ना हसनाळे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढली होती. मात्र ही प्रक्रिया पार पडल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी या सोडतीवर आक्षेप घेतला होता. सोडतीमध्ये बोगस लाभार्थी असल्यामुळे सोडतीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी सरनाईक यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्या पाठोपाठ सोडतीमधील कथित बोगस लाभार्थ्यांची नावेही सरनाईक यांनी जाहीर केली होती. त्यानंतर शिंदे यांनी प्रधान सचिवांच्या माध्यमातून महापालिकेकडून यासंदर्भातला अहवाल मागवला होता.
महापालिकेने सविस्तर माहिती राज्य सरकारकडे सादर केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने पालिकेला पत्र पाठवून सोडतीला स्थगिती न देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे कळवले आहे. महापालिकेने सोडतीसंदर्भात केलेली कार्यवाही नियमानुसार असल्यामुळे, तसेच या प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करून सरकारने स्थगिती न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरकारने महापालिकेला कळवले आहे.
सोडतीसंदर्भात झालेले सर्व आरोप निराधार असल्याचे सरकारच्या निर्णयावरून सिद्ध झाले आहे. सोडतीसंदर्भात सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा योजनेतील लाभार्थ्यांसह आपण स्वत: आंदोलन करू, असे पत्र नगरविकास मंत्र्यांना दिले होते. त्यानंतर लगेचच सरकारने हा निर्णय घेतला. आता महापालिकेने लाभार्थ्यांना घरे देण्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करावी.
- ज्योत्स्ना हसनाळे, महापौर, मिरा-भाईंदर.