चमत्कार प्रात्यक्षिके दाखवून अंधश्रद्धेची पोलखोल
ऐरोलीत जादूटोणा विरोधी कायद्याचे व्याख्यान
तुर्भे, ता. ६ (बातमीदार) : सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून जादूटोणाविरोधी कायद्यावर व्याख्यान नुकतेच झाले. अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे जिल्हा शाखा व श्री संत सावता माळी मंडळ ऐरोली यांच्या विद्यमाने ऐरोलीतील श्री संत सावता माळी सभागृह येथे चमत्कार प्रात्यक्षिकसह व्याख्यान हा कार्यक्रम पार पडला. या व्याखानाचा मूलभूत उद्देश हा जादूटोणाविरोधी कायदा प्रसार, प्रबोधन व प्रसारासाठी करण्यात आले.
ठाणे जिल्हा अ. भा. अंनिसचे अध्यक्ष डॉ. प्रकाश ढोकणे यांनी चमत्कार प्रात्यक्षिके करून त्यामागील वैज्ञानिक दृष्टीकोनाचे स्पष्टीकरण केले. हरिभाऊ पाथोडे यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांचे समाज प्रबोधनाचे काम, वर्णव्यवस्था भेदण्यासाठी सत्यशोधक समाजाची आवश्यकता आणि शिक्षणाचे महत्त्व व अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची ४० वर्षांची वाटचाल याविषयी संवाद साधला. डॉ. हर्षा गोयल यांनी आज भारतीय नारीची जी काही प्रगती झाली आहे, त्याचे सारे श्रेय सावित्रीबाईंनाच द्यावे लागते, असे सांगितले.
रवी खानविलकर यांनी प्रत्येक चमत्कारामागे काही ना काही कार्यकारणभाव असतो. महाराष्ट्रातील २०१३ सालचा जादूटोणा विरोधी कायदा हा सर्वसामान्य माणसाच्या डोक्यातील अंधश्रद्धा दूर करणारा कायदा असल्याचे स्पष्ट केले. नीता डुबे, चंद्रकांत सर्वगोड, जगन्नाथ साबळे यांनी भूत, भानामती, देवी अंगात येणे यांसारख्या अंधश्रद्धांमध्ये केले जाणारे पाण्याने दिवा पेटवणे, जळता कापूर खाणे, अंगावरून जळता टेंबा फिरवणे, केळेवाला बाबा, मंत्राने अग्नी पेटवणे आदी चमत्कार प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यामागील कार्यकारणभाव आणि विज्ञान स्पष्ट करून सांगितले.