बार्टीकडून संशोधक विद्यार्थ्यांना
अद्याप फेलोशिप नाही!
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा आरोप
मुंबई, ता. ६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संशोधक विद्यार्थ्यांना दुजाभावाची वागणूक देत असल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने केला आहे. २०१९ व २०२० या वर्षाची फेलोशिप संशोधक विद्यार्थ्यांना अद्याप देण्यात आलेली नसून २०२१ करिता अजूनपर्यंत प्रक्रियाही सुरू केलेली नाही असे पार्टीने म्हटले आहे.
दरम्यान, बार्टीने सोशालिस्ट पार्टीचा आरोप खोडून काढला आहे. याविषयीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर असून पुढील तीन दिवसांत पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती बार्टीने दिली.
राज्यात सारथी व महाज्योती संशोधन फेलोशिपसाठी २०२१ मध्ये ७२१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. महाज्योतीसाठी २०२१ करिता जवळपास ७०० च्या दरम्यान सर्व संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली; मात्र त्या तुलनेत बार्टीतर्फे सर्वच अर्जदारांस फेलोशिप देण्याऐवजी मर्यादित संख्येने फेलोशिप दिली जात आहे. याची सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी आज केली.
बार्टीअंतर्गत संशोधक फेलोशिपकरिता १९ डिसेंबर २०२१ रोजी लेखी परीक्षा झाली. ५५४ अर्जदारांपैकी ५१७ जणांना गेल्या तीन दिवसांत मुलाखतीकरिता बोलावण्यात आले होते. त्यात ३८० हे पीएच. डी. पदवीधारक असून इतर एम. फिल.धारक विद्यार्थी आहेत. म्हणून या सर्वांनाच (एकूण ५१७ विद्यार्थी) सारथी, महाज्योतीप्रमाणे फेलोशिप द्यावी, अशी मागणी डॉ. माने यांनी केली.
---
कोट...
२०१९-२० वर्षाकरिता विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी मागील महिन्यात लेखी परीक्षा झाली आहे. त्यातील काहींच्या मुलाखतीही सुरू असून पुढील तीन दिवसांत पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. फेलोशिप गुणवत्तेवर आधारित मिळावी यासाठी प्राथमिकता दिली जात आहे; मात्र गुणवत्ता डावलून आणि केवळ फेलोशिप हवी म्हणून अधिक उमेदवारांनी मागणी केल्यास इतक्या विद्यार्थ्यांना फेलोशिप उपलब्ध करून देणे शक्य नाही.
- धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी