ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादकांमध्ये निराशा
मोहोर न लागल्याने उत्पन्न घटण्याची शक्यता
अच्युत पाटील
बोर्डी, ता. ७ (बातमीदार) ः ढगाळ वातावरणामुळे पालघर जिल्ह्यातील आंबा बागायतदार संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निसर्ग साथ देत नसल्यामुळे आंबा बागायतीमध्ये मशागत करणेदेखील शेतकऱ्याला डोईजड झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हताश झाला आहे. तलासरी तालुक्यात ५०, पालघर तालुक्यात १५०, वाडा, विक्रमगड आणि जव्हार तालुक्यात सुमारे ३००, उत्तर वसई तालुक्यात पूर्व भागात ५० हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड विकसित झाली आहे. त्याचबरोबर नैसर्गिक उगवण झालेल्या आंब्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आंब्याच्या उत्पन्नाचा शेतकऱ्याला फार मोठा आधार आहे. पण, खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मागच्या वर्षी १८ व १९ मे रोजी झालेल्या तोत्के वादळाने आंबा बागायतदारांना देशोधडीला लावले. वादळाच्या तडाख्यामुळे बाजारात विक्रीसाठी पाठवण्यास तयार झालेला आंबा भुईसपाट झाला होता. त्यामुळे शेतकऱ्याला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले होते; तरीही शेतकऱ्याने पुढील हंगामासाठी आंबा बागायतीमध्ये कसून मेहनत केली. डिसेंबर महिन्यात डोंगरपट्टीला आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र एक डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला अनुकूल वातावरण निर्मिती झाल्यास पुन्हा मोहोर येण्याची प्रक्रिया ही फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पूर्ण होते. हे फळ साधारण जून महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते; मात्र चालू वर्षी संपूर्ण डिसेंबर महिना व जानेवारी महिन्याची सुरुवात ढगाळ वातावरणाने झाल्यामुळे आंबा बागायती धोक्यात आल्या आहेत.
--------------------
या भागातील शेतकरी कष्टकरी असून कर्जाची परतफेड नियमितपणे करत असतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कोणताही फायदा होत नाही. बागायतीमध्ये नैसर्गिक नुकसान झाल्यानंतर शासनाच्या योजनांचा लाभही मिळत नाही, ही मोठी खंत आहे, असे आंबा बागायतदार विक्रांत म्हात्रे यांनी सांगितले.