पोलिसांमध्येही वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण
आयुक्तालय क्षेत्रात अधिकारी आणि कर्मचारी करोनाबाधित
विरार, ता. ७ (बातमीदार) ः वसई विरार आणि मिरा भाईंदर शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख पुन्हा वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या कचाट्यात पोलिस कर्मचारीही अडकत चालले आहेत. कर्तव्यावर असलेले १८ अधिकारी आणि ५५ कर्मचारी मिरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलिस आयुक्तालयात आढळून आले आहेत.
वसई विरारमधील वालीव, आचोळे, तुळिंज, विरार, पेल्हार, अर्नाळा व माणिकपूर, पोलिस ठाण्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे; तर मिरा भाईंदरमधील मिरा रोड, काशीमिरा, नयानगर, भाईंदर या पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. सुरक्षा शाखा, आर.सी.पी. पथक, वाहतूक विभाग, परिमंडळ कार्यालय, नियंत्रण कक्ष येथेही पोलिसांना कोरोना संसर्ग झाला असल्याने सक्तीच्या रजेवर जावे लागले आहे. त्यातच ५५ वर्षांवरील आजारी पोलिसांना घरून काम करण्यास सांगितल्याने कायदा सुव्यवस्था कशी राखायची, असा प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे.
राज्यभरात ओमिक्रॉन विषाणू पसरण्यास सुरुवात झाली आहे. वसई-विरार महापालिकेच्या परिसरातदेखील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वसई विरार पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार काल पालिका हद्दीत ९०१ रुग्ण आढळून आले आहेत; तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात शासनाकडून दिलेले कोरोना निर्बंधाचे नियम पाळले जावेत, यासाठी सातत्याने पोलिस नागरिकांच्या सहवासात येत आहेत. यामुळे त्यांना बाधा झाल्याचे बोलले जात आहे.