गावदेवी पार्किंगचे काम रखडूनही पुन्हा मुदतवाढ
महापालिका ठेकेदारावर मेहरबान असल्याचा स्थायी समितीत आरोप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ ः शहरातील पार्किंगचा प्रश्न लवकर सुटावा यासाठी गावदेवी मैदानात ३०० गाड्या पार्क होतील अशा मोठ्या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. हे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र. अजूनही १५ टक्के काम अपूर्ण आहे. काम अपूर्ण असताना देखील संबंधित ठेकेदाराला तब्बल ८० टक्के बिल अदा करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका ठेकेदारावर मेहरबान का आहे, असा प्रश्न शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात यावी. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायचे की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सभापती संजय भोईर यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी ठाणे महापालिकेची स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी यांनी गावदेवी पार्किंगच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. गावदेवी पार्किंगच्या कामांची मुदत संपली असताना अजूनही पार्किंगचे काम पूर्ण झाले नसल्याची बाब त्यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली. याशिवाय संबंधित ठेकेदाराला ८० टक्के बिल देखील अदा करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर कार्यकारी अभियंता विकास ढोले यांनी ठेकेदाराला फेब्रुवारी २०२२ पर्यंत कामाची मुदतवाढ दिली असल्याची माहिती या सभागृहात दिली. मात्र प्रशासनाच्या या उत्तराने स्थायी समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कामाची मुदत संपूनही ठेकेदाराला मुदत का द्यायची, ठाणे महापालिका ठेकेदारावर एवढी मेहरबान का आहे, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. त्यानंतर स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी यासंदर्भात सर्व माहिती देण्याची सूचना प्रशासनाला दिली. त्यानंतर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकायचे की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे बैठकीत स्पष्ट केले. २७ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभा राहणार आहे. ७०० चौरस मीटरवर हे बांधकाम होणार असून यामध्ये १३० चारचाकी आणि १२० दुचाकी पार्क करता येणार आहेत.
--------------
यासंदर्भात डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मैदानाला धक्का न लावता पार्किंगचे काम करण्यात यावे यासाठी ही याचिका दाखल करण्यात होती. ठाणे महापालिकेने पार्किंगचे काम झाल्यावर मैदान पूर्ववत करणार असल्याची उच्च न्यायालयात माहिती दिली आहे. जरी भूमिगत पार्किंगचे काम झाले तरी मैदानाचा वापर हा खेळांसाठीच होणार असून मैदान यासाठी पुन्हा पूर्ववत करून देण्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. केवळ भूमिगत पार्किंगमध्ये वाहने आत आणि बाहेर जाण्यासाठी ४ टक्के जागेचा वापर होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.