फरारी घोषित केलेल्या
रियाज भाटीला दिलासा
दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : खंडणी वसुलीच्या प्रकरणात फरारी घोषित केलेल्या रियाज भाटीला आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. भाटीला फरारी घोषित करण्याचा महानगर दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल केला.
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा भाटी हा निकटवर्तीय आहे. गोरेगाव पोलिस ठाण्यात सिंह, भाटी, बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावर बांधकाम व्यावसायिकाने फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिस तपास करीत आहेत. मात्र, वारंवार समन्स बजावूनही सिंह, भाटी आणि आरोपी विनय सिंह हजर न झाल्याने पोलिसांनी त्यांना फरारी घोषित करण्याची मागणी दंडाधिकारी न्यायालयात केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करून तिघांना फरारी जाहीर केले होते. सिंह यांच्यासह विनयसिंह यांचा फरारी आदेश यापैकी न्यायालयाने रद्द केला आहे.
राज्य सरकारने सिंह यांच्या आदेशाविरोधात अपील याचिका केलेली नाही, तसेच संबंधित फरारी घोषित प्रक्रिया नियमानुसार नाही, असे निरीक्षण न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी नोंदविले आहे.
आरोपींनी माझ्याकडून ११.९२ लाख रुपये खंडणी आणि मौल्यवान वस्तू जबरदस्तीने घेतल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक बिमल आगरवाल यांनी तक्रारीत केला आहे. सिंह यांच्याविरोधात पाच खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.
...