मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट करणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेविकेच्या पतीला अटक
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकण्याच्या आरोपाखाली कोपरखैरणेतील भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती संदीप म्हात्रे यांना अटक करण्यात आली. संदीप म्हात्रे यांनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील जनतेमध्ये तेढ व शत्रुत्वाच्या भावना वाढविणारी पोस्ट केली, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
संदीप म्हात्रे हे कोपरखैरणे सेक्टर-६ मध्ये राहाण्यास असून ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पत्नी गीता म्हात्रे या कोपखैरणे भागात नगरसेविका होत्या. कोपरखैरणेतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य असलेल्या ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ या व्हॉट्सअप ग्रुपवर संदीप म्हात्रे हे देखील आहेत. गुरुवारी दुपारी म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटोसह त्यांची बदनामी करणारी पोस्ट ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली होती. ही पोस्ट सदर ग्रुपवर असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख मनोहर मढवी, ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे उपशहर प्रमुख विनयानंद माने, गोपीनाथ आगास्कर, डी. आर. पाटील, सुरेश सकपाळ व इतर पदाधिकाऱ्यांनी कोपरखैरणे पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.