मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ठाणे महापौरांकडून फाटा
- गर्दी जमवीत कोपरी गावात खुल्या रंगमंचाचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ ः दिवसेंदिवस राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा स्फोट होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत. या आवाहनाला फाटा देत ठाण्यातील कोपरी गाव परिसरात उभारण्यात आलेल्या खुल्या रंगमंचाचे उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांनी केले. यावेळी कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.
दिवसेंदिवस ठाणे शहरात ओमिक्रॉन रुग्णांसह कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख चढता आहे. त्यात ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांनी दोन हजारांचा टप्पा पार केला आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के यांनी प्रसिद्धीपत्रक काढून सर्व नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यांच्याच निधीतून ठाणे पूर्व येथील कोपरी गाव येथे उभारण्यात आलेल्या खुल्या रंगमंचाचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. तसेच अनेकांनी मास्कदेखील लावले नव्हते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी उपस्थिती लावली होती. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा खुद्द महापौरच आयोजित करत असल्यामुळे महापौर आणि महापालिका प्रशासनाला सामाजिक जाणीव आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
.....................
कोट :-
हा कार्यक्रम कोपरीतील ग्रामस्थांनी आयोजित केला होता. त्यावेळी ग्रामस्थांना कोरोना नियमांची कल्पना दिली होती. तसेच त्यांनीदेखील माणसे कमी असतील असे सांगितले होते. म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो. लोक जमल्याने गर्दी झाली. गर्दी टाळली पाहिजे हे मी मान्य करतो; परंतु तो कार्यक्रम गावात असल्याने सर्वपक्षीय लोक तेथे उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासूनची कोपरी गावातील ग्रामस्थांची मंडप आणि स्टेजची मागणी पूर्ण होत असल्याने गावातील ग्रामस्थ त्या ठिकाणी जमले होते. तसेच हा कार्यक्रम मी नाही तर ग्रामस्थांनी आयोजित केला होता.
- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे.